
आर्य चाणक्य हे त्या काळातील एक महान विचारवंत होते, कुटनीती तज्ज्ञ होते, तसेच ते अर्थतज्ज्ञ देखील होते. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये अर्थशास्त्र सोप्या भाषेमध्ये आणि छोटे-छोटे उदाहरणं देऊन समजून सांगीतलं आहे, पैशांची बचत कशी करावी? पैसा कुठे खर्च करावा? पैसा कशा पद्धतीनं कमवला पाहिजे, एखाद्या व्यक्तीकडे श्रीमंत होण्यासाठी कोणते गुण आवश्यक असतात, अशा एकना अनेक गोष्टी चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात, तुमच्यावर कितीही मोठं संकट येऊ द्या, त्या संकटाचं एकमेव उत्तर असतं ते म्हणजे पैसा, त्यामुळे आपण जो पैसा कमवतो त्यातील काही भाग हा बचत म्हणून बाजूला ठेवलाच पाहिजे, जेव्हा तुमच्यावर संकट येतं, तेव्हा अशा स्थितीत हा तुम्ही बचत केलेला पैसा तुमच्या कामाला येतो, चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये श्रीमंत होण्याचे काही मार्ग सांगीतले आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
जीवन व्यवस्थापन – चाणक्य म्हणतात प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं करता आलं पाहिजे, म्हणजे जी ती गोष्ट ही योग्य वेळेतच व्हायला हवी, शिक्षण योग्य वेळेत व्हायला हवं, रोजगार योग्य वेळेत मिळायला हवा, तुम्ही जर तुमच्या आयुष्याचं काटेकोर नियोजन केलं तर नक्कीच एक दिवस तुम्ही श्रीमंत व्हाल.
यशाचा मार्ग – चाणक्य म्हणतात जे लोक स्वत:ला सिद्ध करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करतात असे लोक आयुष्यात नक्कीच यशस्वी होतात.
वेळेची किंमत – चाणक्य म्हणतात आयुष्यात सगळ्यात जास्त जर कोणत्या गोष्टीला महत्त्व असेल तर ते वेळेला आहे, एकदा वेळ निघून गेली तर हातामध्ये काहीही राहत नाही, त्यामुळे वेळेची किंमत करा.
योग्य वेळी निर्णय – चाणक्य म्हणतात व्यक्तीच्या आयुष्यात निर्णय खूप महत्त्वाचा असतो, तुमचा निर्णय चुकला की बरोबर आहे, ही नंतरची गोष्ट पण सगळ्यात आधी तुम्हाला योग्य वेळी निर्णय घेता आला पाहिजे.
योजना गुप्त ठेवा – चाणक्य म्हणतात जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या सर्व योजना या गुप्त ठेवा, तरच तुम्हाला यश मिळू शकतं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)