Chanakya Niti : मुलांना या गोष्टींपासून नेहमी दूर ठेवा, चाणक्यांचा पालकांना सल्ला

आर्य चाणक्य हे एक मोठे विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होतेच, परंतु ते एक चांगले शिक्षक देखील होते. चाणक्य म्हणतात मुलांच्या जडणघडणीमध्ये आई-वडिलांचा सर्वात मोठा वाटा असतो. त्यामुळे आई-वडिलांनी आपल्या मुलांचं संगोपन करताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं.

Chanakya Niti : मुलांना या गोष्टींपासून नेहमी दूर ठेवा, चाणक्यांचा पालकांना सल्ला
chanakya
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 26, 2026 | 8:45 PM

आर्य चाणक्य हे एक चांगले शिक्षक देखील होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये आई-वडिलांनी मुलांवर संस्कार कसे करावेत? मुलांच्या जीवनात आई-वडिलांची भूमिका काय असते? आदर्श आई-वडील कोणाला म्हणावं? याबद्दल चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात मुलांवर योग्य संस्कार होणं गरजेचं असतं. मुलांवर आई-वडिलांनी योग्य संस्कार केले तर अशी मुलं आपल्या कुळाचं नावं मोठं करतात. आपल्या आई-वडिलांची मान जगात उंचावेल असं काम करतात. परंतु जर त्यांच्यावर संस्कार झाले नाहीत तर अशी मुलं वाईट वळणाला लागतात. ते आयुष्यात फार काही करू शकत नाहीत. परिणामी अशी मुलं आपल्या कुटुंबाचं तर वाटोळं करतातच परंतु अशी मुलं त्या राष्ट्रासाठी देखील ओझं असतात. कारण सशक्त आणि संस्कारशील तरुण पिढी ही कोणत्याही राष्ट्रासाठी मोठी संपत्ती असते. त्यामुळे आई-वडिलांनी आपल्या मुलांना काही गोष्टींपासून दूर ठेवावं असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

खोटे बोलण्याची सवय – आर्य चाणक्य म्हणतात प्रत्येक आई-वडिलांचं कर्तव्य आहे की, त्यांनी आपल्या मुलांवर सत्य बोलण्याचे संस्कार करावेत. परिस्थिती कशी असो माणसानं सत्य बोललंच पाहिजे, त्यामुळे मुलांना खोटं बोलण्याची सवय लागू देऊ नका.जर मुलांना खोटं बोलण्याची सवय लागली तर भविष्यात अशा व्यक्तीवर कोणीही विश्वास ठेवणार नाही, त्याचं आयुष्यात फार मोठं नुकसान होऊ शकतं, त्यामुळे आपल्या मुलांना नेहमी सत्य बोलण्याची सवय लावा, असा सल्ला चाणक्य यांनी दिली आहे.

मुलांना योग्य, अयोग्य गोष्टींची जाणीव करून द्या – चाणक्य म्हणतात लहान मुलं ही खोडकर असतात. ते तुमची प्रत्येक गोष्ट ऐकतीलच असं नाही, त्यामुळे त्यांना विश्वासात घेऊन, प्रेमाने चूक आणि बरोबर यातील फरक समजून सांगावा. त्यांची निर्णय क्षमता वाढवण्यासाठी चालना द्यावी.

आळस – चाणक्य म्हणतात आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे, त्यामुळेच आई-वडिलांनी मुलांवर नेहमी श्रमप्रतिष्ठेचे संस्कार करावेत. त्यांना त्याच्या वयानुसार काही छोटी-मोठी काम सांगावीत. योग्य वेळेत अभ्यास पूर्ण करून घ्यावा. ज्या मुलांना त्यांच्या लहानपणी श्रमप्रतिष्ठेचं महत्त्व समजतं, अशी मुलं आयुष्यात प्रचंड प्रगती करतात असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

Follow Us