मोती घातल्याने दूर होतात ‘या’ 3 समस्या; पण धारण करण्यापूर्वी जाणून घ्या योग्य नियम
ज्योतिषशास्त्र आणि रत्नशास्त्रात मोती या रत्नाला विशेष महत्त्व आहे. मोतीचा संबंध चंद्र ग्रहाशी जोडला जातो. धार्मिक मान्यतेनुसार मोती धारण केल्याने काही समस्या लगेच दूर होतात. मात्र, मोती घालताना काही नियम पाळणेही महत्त्वाचे आहे.

रत्नशास्त्रात प्रत्येक रत्नाचा संबंध विशिष्ट ग्रहाशी जोडला जातो. त्यानुसार मोती हे रत्न चंद्र ग्रहाचे प्रतीक मानले जाते. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, चंद्राचा प्रभाव मन, भावना आणि मानसिक शांततेशी संबंधित असतो. त्यामुळे मन अस्थिर राहणे, छोट्या छोट्या गोष्टींवरून राग येणे किंवा एकाग्रता कमी होणे अशा समस्या असणाऱ्यांना मोती धारण करण्याचा सल्ला दिला जातो. मोती केवळ दागिना म्हणून नव्हे, तर ज्योतिषीय उपाय म्हणूनही वापरला जातो. मात्र, हे रत्न धारण करण्यापूर्वी त्याचे फायदे आणि ते घालण्याची योग्य पद्धत जाणून घेणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया मोती धारण केल्याने कोणते फायदे मिळतात आणि तो घालताना कोणते नियम पाळावेत.
राग आणि चिडचिड कमी होण्यास मदत
रत्नशास्त्रानुसार, मोती धारण केल्याने मन शांत राहण्यास मदत होते, अशी मान्यता आहे. ज्या लोकांना छोट्या छोट्या गोष्टींवरून राग येतो किंवा सतत चिडचिड होते, त्यांच्यासाठी मोती फायदेशीर मानला जातो. हे रत्न मनातील अस्वस्थता कमी करून भावनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते, असे सांगितले जाते.
शांत झोप लागण्यास मदत
काही लोकांना रात्री झोप न लागण्याची समस्या असते. त्यामुळे दिवसभर थकवा, चिडचिड आणि अस्वस्थता जाणवू शकते. ज्योतिषीय मान्यतेनुसार, मोती धारण केल्याने मन शांत राहते आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. त्यामुळे झोपेच्या तक्रारी असणारे काही लोक मोती धारण करण्यास प्राधान्य देतात.
एकाग्रता वाढण्यास मदत
रत्नशास्त्रानुसार, मोती धारण केल्याने एकाग्रता वाढते, असे मानले जाते. विशेषतः अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे रत्न उपयुक्त मानले जाते. अभ्यास किंवा काम करताना मन भरकटत असेल, तर मोती धारण केल्याने मन स्थिर राहण्यास मदत होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
मोती धारण करण्याची योग्य पद्धत कोणती?
ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, मोती नेहमी चांदीच्या अंगठीत बसवून धारण करावा. चंद्र ग्रहाचा संबंध चांदीशी जोडला जात असल्याने या धातूमध्ये मोती घालणे शुभ मानले जाते. मोती धारण करण्यासाठी सोमवार हा दिवस योग्य मानला जातो. तसेच पारंपरिक मान्यतेनुसार, मोत्याची अंगठी उजव्या हाताच्या सर्वात लहान बोटात म्हणजेच करंगळीत घालावी.
मोती धारण करण्यापूर्वी काय करावे?
मोत्याची अंगठी थेट बोटात घालण्याऐवजी आधी तिचे शुद्धीकरण करावे, असे ज्योतिषशास्त्रात सांगितले जाते. यासाठी अंगठी कच्चे दूध आणि गंगाजलाने स्वच्छ करावी. त्यानंतर ‘ॐ सोमाय नमः’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मोती धारण करण्याची परंपरा आहे.
मात्र, प्रत्येक व्यक्तीसाठी मोती योग्य असेलच असे नाही. त्यामुळे मोती धारण करण्यापूर्वी कुंडलीतील चंद्राची स्थिती तपासून जाणकार ज्योतिषांचा सल्ला घ्यावा, असे रत्नशास्त्रात सांगितले जाते.
(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)