45 वर्षांपासून थक्क करणारी परंपरा, या गावात मशिदीत बसतो बाप्पा

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील गोटखिंडी गावात गेल्या ४५ वर्षांपासून हिंदू-मुस्लिम समाज एकत्रितपणे गणेशोत्सव साजरा करत आहे. स्थानिक मशिदीत गणेश प्रतिष्ठापना करून हा उत्सव साजरा केला जातो. ही परंपरा १९८० पासून सुरू आहे.

45 वर्षांपासून थक्क करणारी परंपरा, या गावात मशिदीत बसतो बाप्पा
| Updated on: Sep 02, 2025 | 10:42 PM

देशात अनेक ठिकाणी धार्मिक सलोख्याला आव्हान दिले जात आहे. पण सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील गोटखिंडी हे गाव मात्र यासाठी अपवाद आहे. या गावातील लोक गेल्या ४५ वर्षांपासून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे एक उत्कृष्ट उदाहरण सादर करत आहे. या गावात मशिदीमध्येच गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करुन गणेशोत्सव साजरा करण्याची अनोखी परंपरा जपली जात आहे. इथे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाज मोठ्या उत्साहात एकत्र येऊन गणेशाची आराधना करतात.

मशिदीत गणेशाची विधिवत पूजा

या परंपरेची सुरुवात १९६१ साली झाली. जोरदार पावसामुळे गावात सुरू असलेल्या गणेशोत्सवादरम्यान झुंजार गणेश मंडळाची गणेश मूर्ती भिजत होती. त्यावेळी गावातील मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेऊन ती मूर्ती मशिदीच्या आत सुरक्षित ठिकाणी ठेवली. या घटनेतून प्रेरणा घेऊन १९८० साली गावातील ‘न्यू झुंजार गणेशोत्सव मंडळा’ने मशिदीमध्येच गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांमध्ये मशिदीत गणेशाची विधिवत पूजा केली जाते. यात मुस्लिम बांधव देखील मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात.

आमच्यातील बंध आणि विश्वासाची साक्ष

या मंडळाचे माजी अध्यक्ष इलाही पठाण यांनी सांगितले, हा उत्सव आमच्यासाठी केवळ एक सण नसून तो आमच्या गावाच्या एकजुटीचे आणि प्रेमाचे प्रतीक आहे. दोन्ही समाज एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. ज्यामुळे आमचे संबंध अधिक मजबूत झाले आहेत. गावातील ग्रामस्थ अशोक पाटील यांनी सांगितले की “गेल्या ४५ वर्षांपासून आम्ही ही परंपरा जपली आहे. ही केवळ पूजा नसून, ती आमच्यातील बंध आणि विश्वासाची साक्ष आहे.”

आमच्यातील बंध आणि विश्वासाची साक्ष

यावर्षी गणेशोत्सवादरम्यान मुस्लिम समाजाचा श्री देवी हा सण आल्याने दोन्ही समाज मिळून तोही एकत्रित साजरा करणार आहेत. यामुळे दोन्ही धर्मांचा आदर आणि सलोखा अधिक दृढ झाला आहे. आजच्या काळात जिथे धार्मिक तणाव वाढताना दिसतो, तिथे गोटखिंडी गावातील ही परंपरा संपूर्ण देशासाठी एक आदर्श आहे. हा उत्सव धर्मांध विचारांना छेद देतो आणि धार्मिक सलोख्याचे महत्त्व अधोरेखित करतो.

या परंपरेमुळे आमच्या पिढीला हिंदू-मुस्लिम ऐक्याचे महत्त्व कळले आहे आणि आम्ही ती पुढे घेऊन जाण्यास कटिबद्ध आहोत. गोटखिंडीतील ही परंपरा केवळ एक सण नसून, ती मानवी मूल्यांची आणि सामाजिक सलोख्याची एक सशक्त गाथा आहे, जी भविष्यातही अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असे गावातील तरुण सुनील काशिद यांनी सांगितले.