Shravan 2022: श्रावण सुरू होण्याआधी नॉनव्हेज प्रेमी मारत आहेत चिकन मटणावर ताव!

दरात वाढ असली तरी कोल्हापूरकर खवय्ये मात्र आज तांबडा पांढरा वर ताव मारण्याच्याच मूडमध्ये आहेत. वर्षभर मांसाहार करणारे बरेच जण श्रावण आणि नवरात्रीत मांसाहार टाळतात.

Shravan 2022: श्रावण सुरू होण्याआधी नॉनव्हेज प्रेमी मारत आहेत चिकन मटणावर ताव!
नॉनव्हेज प्रेमींची मटण शॉपमध्ये गर्दी
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jul 27, 2022 | 2:21 PM

कोल्हापूर,  आषाढ महिना संपून परवापासून श्रावण (Shravan) सुरू होतोय. श्रावणात मांसाहार वर्ज असल्याने आषाढाच्या अखेरच्या दिवशी कोल्हापूरकरांनी चिकन मटणावर ताव मारण्याचा बेत आखलाय. त्यासाठी नॉनव्हेज प्रेमींनी सकाळपासूनच कोल्हापुरातील मटण मार्केटमधील दुकानाच्या बाहेर रांगा लावल्या आहेत.  चिकन मटणाबरोबरच मासे आणि खेकड्याना देखील कोल्हापूरकर खवय्यांची पसंती मिळतेय. आज मागणी वाढल्याने चिकन मटणाच्या दरात देखील दहा ते वीस रुपयांपर्यंतची वाढ झाली आहे. दरात वाढ असली तरी कोल्हापूरकर खवय्ये मात्र आज तांबडा पांढरा वर ताव मारण्याच्याच मूडमध्ये आहेत. वर्षभर मांसाहार करणारे बरेच जण श्रावण आणि नवरात्रीत मांसाहार टाळतात. अनेकांच्या घरी श्रावण महिना कडक पाळला जातो त्यामुळे मांसाहार बनत नाही. पुढे महिनाभर मांसाहार करायला मिळणार नाही म्हणून आता शेवटच्या दिवशी अनेक जण चिकन मटणावर ताव मारणार आहेत.

सध्या उत्तर भारतीयांचा श्रावण महिना सुरु आहे. मराठी लोकांचा श्रावण महिना 29 जुलैपासून सुरू होईल.  बऱ्याच जणांच्या घरी महादेवाचे नवरात्र देखील बसते. श्रावण महिन्यात महादेवाच्या पूजेला विशेष महत्त्व असते. विशेषतः श्रावण सोमवारी महादेवाची पूजा आणि उपवास अनेक जण करतात. हिंदू धर्मीयांमध्ये हा महिना अत्यंत पवित्र मानण्यात येतो. या काळात मांसाहार वर्ज करून सात्विक भोजनाकडे अनेकांचा कल असतो. बऱ्याच जणांकडे कांदा आणि लसूणसुद्धा वर्ज असते. तामसीक आहारापासून स्वतःला लांब ठेवणे हा यामागचा उद्देश असतो.

बऱ्याच ठिकाणी श्रावण महिन्यात चिकन-मटणाचे दुकानसुद्धा बंद असते तर जिथे सुरू असते तिथे एखाद दुसरा ग्राहक येतो. या काळात विक्री अभावी अनेकांचे व्यवसाय मंदावतात याची कसर ते श्रावण संपल्यानंतर ते भरूनही काढतात. सध्या श्रावण सुरू होण्याआधी मटण विक्रेते दरात वाढ करून हा तोटा भरून काढत आहेत.