
गुरुड पुराण हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा ग्रंथ आहे, गरुड पुराणाचा समावेश हा, 18 महापुराणामध्ये होतो. व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा आत्मा कसा प्रवास करतो? या प्रवासाचं संपूर्ण वर्णन गरुड पुराणामध्ये करण्यात आलं आहे. पृथ्वीवर जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू निश्चित आहे, व्यक्तीचा जेव्हा मृत्यू होतो, तेव्हा त्याने आपल्या आयुष्यात कर्म काय केले आहेत, चांगले कर्म केले आहेत की वाईट कर्म केले आहेत? यावरून त्याचा आत्मा स्वर्गात जाणार की नरकात जाणार हे ठरतं. गरुड पुराणानुसार जो व्यक्ती धर्माचं पालन करतो, तो स्वर्गात जातो. याच्या उलट जो व्यक्ती पाप करतो, एखाद्या व्यक्तीचा छळ करतो, हिंसा करतो, दुसऱ्याची संपत्ती हडपतो, स्वार्थी असतो असा व्यक्ती नरकात जातो, असं गरुड पुराणामध्ये सांगण्यात आलं आहे. गरुड पुराणानुसार जेव्हा मनुष्य नरकात जातो, तेव्हा तिथे त्याला त्याच्या पापाची शिक्षा मिळते. गरुड पुराणामध्ये नरकाचं देखील वर्णन करण्यात आलं आहे. गरुड पुराणामध्ये अशी पाच नरकं सांगण्यात आले आहेत, जिथे व्यक्तीने विशिष्ट पाप केल्यास त्याला शिक्षा मिळते, अशा पाच नरकाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
कालसूत्र नरक – वृद्ध व्यक्तीचा अपमान करणारे व्यक्ती, प्रचंड अंहकारी व्यक्ती अशा लोकांना या कालसूत्र नरकात टाकलं जातं. गरुड पुराणानुसार या नरकामध्ये प्रचंड उष्णता असते, ही उष्णता आत्म्याला सहन होत नाही, प्रचंड त्रास होतो.
कुंभीपाक नरक – आपल्या स्वार्थासाठी जनावरांची हत्या करणे हे गरुड पुराणामध्ये सर्वात मोठं पाप मानलं गेलं आहे. अशा व्यक्तीला कुंभीपाक नरकामध्ये टाकलं जातं, या नरकामध्ये व्यक्तीच्या आत्म्याला उकळत्या तेलात टाकलं जातं असं गरुड पुराणामध्ये म्हटलं आहे.
रौरव नरक – स्वार्थी लोक, जे स्वत:च्या स्वार्थासाठी इतरांची फसवणूक करतात अशा लोकांची रवानगी रौरव नरकामध्ये करण्यात येते, असं गरुड पुराणामध्ये सांगण्यात आलं आहे.
अंधतमिस्रम नरक – जे लोक विवाहबाह्य संबंध ठेवतात अशा लोकांची रवानगी अंधतमिस्रम नरकामध्ये केली जाते असं गरुड पुराणामध्ये म्हटलं आहे.
तमिश्रम नरक – जर तुम्ही एखाद्याची फसवणूक करून त्याची संपत्ती हडप केली तर तुमची रवानगी तमिश्रम नरकामध्ये होते, असं गरुड पुराणामध्ये सांगण्यात आलं आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)