
शुभकार्याच्या सुरुवातीला आणि धार्मिक प्रसंगी नारळ फोडतात हे तुम्हाला माहिती आहे, अनेकदा आपण मंदिरात जातो तेव्हाही नारळ फोडला जातो. यामागील कारण काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

धार्मिक श्रद्धेनुसार नारळ हे मानव जातीचे प्रतीक मानले जाते. नारळाच्या बाह्य भागावरील केसांना मानवी केस मानले जाते, तर कठीण भागाला कवटी मानले जाते. तसेच आतील पाण्याला रक्त मानले जाते.

धार्मिक कार्यात नारळ फोडून आपण देवाच्या साक्षीने अहंकार सोडून देतो. तसेच धार्मिक कार्यक्रमात नारळ फोडणे हे भक्ती आणि समर्पणाचे प्रतीक मानले जाते. सुरुवातीला नरबळी दिला जात होता, ही प्रथा संपवण्यासाठी नारळाचा बळी देण्याची प्रथा सुरू झाल्याचे बोलले जाते.

नारळ गणपती, माता, लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आवडते फळ मानले जाते. त्यामुळे कार्यात नारळ फोडून आपण या सर्व देवतांना प्रसन्न करतो. तसेच देवाच्या चरणी नारळ पाणी वाहने शुभ मानले जाते.

नारळ हे फळ माता लक्ष्मीशी संबंधित आहे, यामुळे त्याला श्रीफळ असेही म्हणतात. यामुळे नारळ सकारात्मकता आणि समृद्धीचे प्रतीक बनतो. याच कारणामुळे धार्मिक कार्यक्रमात आणि शुभ कार्याच्या सुरुवातीला नारळ फोडला जातो.