गाडीला किंवा दाराला लिंबू-मिरची का लावतात? नजर की आणखी काही? 99% लोकांना हे महत्त्वाचं कारण नसेल माहित

गाड्यांवर किंवा घरांवर लिंबू-मिरची बांधण्याची प्रथा अंधश्रद्धेपेक्षाही जास्त आहे. कालांतराने ही प्रथा अंधश्रद्धेशी जोडली गेली, परंतु तिचे मूळ वैज्ञानिक आणि सांस्कृतिक आहे.

गाडीला किंवा दाराला लिंबू-मिरची का लावतात? नजर की आणखी काही? 99% लोकांना हे महत्त्वाचं कारण नसेल माहित
| Updated on: Sep 19, 2025 | 3:10 PM

गेल्या कित्येक वर्षांपासून घराबाहेर किंवा गाडीवर लिंबू-मिरची बांधण्याची प्रथा सुरु आहे. घराबाहेर किंवा गाडीवर लिंबू-मिरची बांधल्यामुळे नजर लागत नाही, असे म्हटले जाते. त्यासोबतच या प्रथेमागे विविध अंधश्रद्धाही जोडलेल्या आहेत. मात्र दाराला किंवा गाडीला लिंब-मिरची बांधण्याच्या प्रथेमागे केवळ अंधश्रद्धा नाही, तर त्यामागे काही रंजक गोष्टी दडलेल्या आहेत. आज आपण या प्रथेमागील नेमकं कारण काय होतं, याबद्दल जाणून घेणार आहोत.

घराबाहेर किंवा गाडीवर लिंबू मिरची बांधण्यामागे केवळ अंधश्रद्धा नसून काही ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कारणेही आहेत. पूर्वीच्या काळी, जेव्हा आजच्यासारख्या आरोग्य आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हत्या, तेव्हा लिंबू-मिरचीचा वापर आरोग्यासाठी आणि संरक्षणासाठी केला जात असे. लिंबू-मिरचीचा उपयोग कीटकनाशक म्हणून होतो. कारण त्यांच्यातील उग्र वासामुळे डास आणि इतर कीटक दूर राहतात. याव्यतिरिक्त, लिंबू आणि मिरची हवेतील जंतू आणि नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात. ज्यामुळे वातावरण शुद्ध आणि सकारात्मक राहण्यास मदत होते.

आरोग्य आणि प्रथमोपचार

लिंबू : लांबच्या प्रवासात तहान लागल्यावर पाणी न मिळाल्यास, लिंबू तोंडात पिळून लाळ निर्माण करता येते, ज्यामुळे तहान तात्पुरती भागते.

मिरची : साप चावल्यास, तो विषारी आहे की बिनविषारी हे तपासण्यासाठी मिरची खाऊ घातली जात असे. जर मिरची तिखट लागली नाही, तर साप विषारी होता असा अंदाज बांधला जात असे. मात्र. ही पद्धत वैज्ञानिकदृष्ट्या अचूक नाही आणि यामुळे उपचार करण्यात उशीर होऊ शकतो.

बिब्बा : बिब्ब्याला एक उत्कृष्ट अँटीबायोटिक मानले जात होते. कापल्यावर किंवा जखम झाल्यावर त्यावर बिब्बा लावला जात असे.

तार : जर प्रवासादरम्यान तुमच्या पायाला काटा लागला, तर तो काढण्यासाठी तारेचा वापर केला जायचा.

लिंबू-मिरची लावण्यामागील आणखी एक कारण

काही तज्ज्ञ या प्रथेमागे वैज्ञानिक कारणे असल्याचा दावा करतात. लिंबू आणि मिरचीमध्ये असलेले गुणधर्म पर्यावरणाची स्वच्छता राखण्यास मदत करतात, असे मानले जाते. लिंबू आणि मिरचीचा उग्र वास डास, माश्या आणि इतर कीटकांना दूर ठेवतो. यामुळे घर किंवा गाडीचे वातावरण शुद्ध राहते. तसेच यामुळे लोकांना रोगराईपासून वाचवण्यास मदत होते. लिंबाचे झाड आजूबाजूचे वातावरण शुद्ध ठेवते, असा समज आहे. प्रत्येक घरात झाड लावणे शक्य नसल्याने, लोक घराच्या किंवा गाडीच्या दारावर लिंबू-मिरची टांगतात. हे लिंबू-मिरची हवेतील जंतू आणि नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात. त्यामुळे वातावरण सकारात्मक राहते.

दरम्यान लिंबू-मिरची बांधण्यामागे प्रथमोपचाराचे कारण असेल तरी कालांतराने ही प्रथा अंधश्रद्धा म्हणून ओळखली जाऊ लागली. आजच्या काळात, अनेक लोक हे केवळ वाईट नजर लागत नाही आणि अपघात टळतात यामुळे लिंबू मिरची बांधतात. मात्र, आधुनिक विज्ञानानुसार, या प्रथेमागे कोणताही ठोस पुरावा नाही. त्यामुळे, ही प्रथा वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध होत नाही.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)