फिफा विश्वचषकात टीम नाही, पण या देशात तयार होतात जगातील 70 टक्के फुटबॉल, नाव वाचून बसेल धक्का
Footballs Manufacturing Industry: जगभरात फुटबॉल खेळाला मोठी लोकप्रियता आहे. युरोपसह इतर खंडात या खेळाला मोठी प्रतिष्ठा आहे. भारताशेजारील या देशाचा संघ अद्याप फिफा विश्वचषकात धडकला नसला तरी जगातील 70 टक्के फुटबॉल इथेच तयार होतात.

Pakistan Sialkot Football: लहान गावांपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर फुटबॉलची जगभरात मोठी क्रेझ आहे. मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी वापरले जाणारे बहुतांश फुटबॉल कुठे तयार होतात हे तुम्हाला माहिती आहे का? भारताचा शेजारील देश पाकिस्तान जगातील 70 टक्के फुटबॉल तयार करतो असे जर कुणी सांगितले तर त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. सियालकोट ही फुटबॉल निर्मितीची राजधानी मानली जाते. इथे जगातील सर्वाधिक फुटबॉल तयार होतात. जगभरातील मैदानावर वापरले जाणाऱ्या 100 पैकी 70 फुटबॉल एकट्या सियालकोटमधील कारखान्यात तयार होतात.
हाताने शिवलेल्या फुटबॉलची ओळख
सियालकोटमध्ये तयार होणाऱ्या फुटबॉलपैकी जवळपास 80 टक्के चेंडू हे आजही हाताने शिवले जातात हे त्याचे वैशिष्ट्ये आहे. हाताने केलेल्या शिलाईमुळे धाग्यांचा ताण योग्य राहतो. चेंडू मजबूत आणि टिकाऊ राहतो. तसेच एरोडायनॅमिक्सच्या नियमानुसार, हवेत या चेंडूंची गती आणि दिशा अधिक संतुलित राहते. यामुळे खेळाडूंना चेंडूवर चांगले नियंत्रण ठेवता येते. विशेष म्हणजे 20२२ मधील कतार येथील फिफा विश्वचषकातील अधिकृत चेंडू ॲडिडास अल रिहला हा सुद्धा पाकिस्तानमधील सियालकोटमध्येच तयार करण्यात आला होता.
चिनी साहित्याचा मोठा वापर
फुटबॉल तयार करण्यासाठी सिथेंटिक लेदरचा वापर करण्यात येतो. या फुटबॉलसाठी कापूस, पॉलिस्टर, पॉलीयुरेथेन हा सर्व कच्चा माल चीनमधून मागवला जातो. स्वस्त फुटबॉलसाठी कमी किंमतीच्या चिनी साहित्याचा वापर करण्यात येतो. तर अधिक दर्जेदार चेंडूंसाठी दक्षिण कोरियातून सियालकोट माल आयात करते. जर्मन बुंडेसलिगा आणि इतर युरोपियन लीगमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रिमियम फुटबॉलसाठी जपानी साहित्याचा वापर करण्यात येतो. पारंपारिक फुटबॉल 20 षटकोनी आणि 12 पंचकोनी तुकड्यांना शेकडो टाके घालून जोडला जातो. तर आधुनिक थर्मो बॉन्डिंग तंत्रज्ञानात उष्ण गोंदाच्या मदतीने तुकडे जोडले जातात. यामुळे चेंडू अधिक गुळगुळीत आणि वॉटरप्रुफ असतो. जागतिक फुटबॉल बाजारपेठेत पाकिस्तानचा दबदबा आहे. फुटबॉल निर्मितीत सियालकोट शहराने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. यामुळे येथे रोजगार निर्मितीलाच नाही तर व्यापाऱ्यालाही मोठा हातभार लागला आहे. स्थानिक तरुणांसोबतच चीनसोबतच्या व्यापाऱ्यालाही चालना मिळाली आहे.