बाळासाहेब ठाकरेंनी मला घरी बोलावलं अन्.. मनोज वाजपेयीने सांगितला किस्सा, मराठी नसल्याचं समजल्यावर..
'सत्या' चित्रपटातील भीकू म्हात्रेच्या भूमिकेमुळे मनोज वाजपेयी मराठी असल्याचा समज खुद्द बाळासाहेब ठाकरे यांचाही झाला होता. मात्र, अभिनेता महाराष्ट्रातील नसल्याचं समजल्यावर बाळासाहेबांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. मनोज वाजपेयीनेच सांगितला खास किस्सा.

Manoj Bajpayee: ‘सत्या’ चित्रपटातील भीकू म्हात्रे ही भूमिका साकारून अभिनेता मनोज वाजपेयी रातोरात लोकप्रिय झाला. या भूमिकेतील त्याचा मराठी बोलण्याचा अंदाज आणि व्यक्तिमत्त्व इतकं प्रभावी होतं की अनेकांना तो खरोखरच महाराष्ट्रातील असल्याचं वाटलं. खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही असाच समज झाला होता. मात्र मनोज वाजपेयी हा महाराष्ट्रातील नसल्याचं समजताच बाळासाहेबांना आश्चर्याचा धक्का बसला होता. एका मुलाखती मनोज वाजपेयीने हा खास किस्सा सांगितला.
बाळासाहेब ठाकरे यांनाही वाटलं होतं मनोज वाजपेयी मराठी
राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘सत्या’ हा चित्रपट 1998 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने मनोज वाजपेयीच्या करिअरला मोठी कलाटणी दिली. त्यातील भीकू म्हात्रे या गुंडाच्या भूमिकेनं त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. विशेष म्हणजे, या भूमिकेमुळे अनेक प्रेक्षकांना मनोज वाजपेयी मराठी असल्याचा समज झाला होता. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत मनोजने सांगितलं की, केवळ प्रेक्षकच नव्हे तर खुद्द बाळासाहेब ठाकरे यांचाही असाच समज झाला होता. बाळासाहेबांनी त्याला भेटण्यासाठी आपल्या घरी बोलावलं होतं. या भेटीत त्यांनी मनोजचं खूप आदराने स्वागत केलं. मात्र, तो महाराष्ट्रातील नसल्याचं समजल्यावर त्यांना आश्चर्य वाटलं.
मनोज याविषयी म्हणाला, “इतर कुणी नाही, तर खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनाही मी मराठी असल्याचं वाटलं होतं. त्यांनी मला घरी बोलावलं होतं. मला खूप आदर दिला. पण मी महाराष्ट्रातील नाही, हे समजल्यावर ते पूर्णपणे गोंधळून गेले. त्यानंतर त्यांनी मला मराठी शिकण्यास सांगितलं. ते थोडे निराश झाले होते. मात्र, माझी त्यांच्यासोबतची भेट खूप छान झाली. त्यांनी मला भविष्यासाठी भरपूर आशीर्वाद दिले.”
‘सत्या’ने बदललं मनोज बाजपेयी यांचं करिअर
मनोज बाजपेयीने यापूर्वी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ‘सत्या’ला त्याच्या करिअरमधील गेमचेंजर म्हटलं होतं. या चित्रपटाने केवळ त्याचं आयुष्यच बदललं नाही, तर हिंदी चित्रपटसृष्टीतील कथा सांगण्याची पद्धत, अभिनय आणि चित्रपट निर्मितीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला, असं त्याने सांगितलं होतं. चित्रपटाच्या यशानंतर त्याला मोठ्या चित्रपटांमध्ये काम करण्याच्या संधी मिळाल्या. इंडस्ट्रीत आदर आणि ओळखही मिळाली.
25 हजार रुपयांत तयार केला होता भीकू म्हात्रेचा लूक
या चित्रपटाशी संबंधित आणखी एक रंजक आठवण मनोज वाजपेयीने सांगितली होती. भीकू म्हात्रेच्या व्यक्तिरेखेचा लूक तयार करण्यासाठी त्याला 25 हजार रुपयांचं बजेट देण्यात आलं होतं. त्याने स्वतः हिल रोड परिसरात जाऊन शर्ट, जीन्स आणि बनियन यांची खरेदी केली होती. भीकू म्हात्रे नेमके कसे कपडे घालेल, याची त्याला स्पष्ट कल्पना होती. त्यामुळे व्यक्तिरेखेचा प्रत्येक पोशाख त्याने स्वतः निवडला होता.
