बॉलिवूड म्हणजे बकवास, इथे दुसऱ्याचं सुख बघवत नाही; मनोज वाजपेयीकडून इंडस्ट्रीची पोलखोल
Manoj Bajpayee: मनोज वाजपेयीच्या या वक्तव्यामुळे बॉलिवूडमधील स्पर्धा, कलाकारांमधील संबंध आणि नव्या प्रतिभांना मिळणाऱ्या संधींबाबत चर्चा सुरू झाली आहे. बॉलिवूड म्हणजे बकवास आहे, असं त्याने म्हटलंय.

Manoj Bajpayee: बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते मनोज वाजपेयी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याच्या अभिनयाची नाही, तर हिंदी चित्रपटसृष्टीबद्दल त्याने केलेल्या स्पष्ट विधानाची चर्चा सुरू आहे. बॉलिवूडमध्ये एकमेकांना मदत केली जाते, कलाकार एकमेकांच्या यशाचा आनंद साजरा करतात आणि संपूर्ण इंडस्ट्री एक कुटुंब असल्याप्रमाणे वागते, असं अनेकदा म्हटलं जातं. मात्र, मनोज वाजपेयीने या समजुतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ‘इंडस्ट्री म्हणजे एक कुटुंब आहे, हा सर्वांत मोठा भ्रम आहे. इथे दुसऱ्याला यशस्वी होताना पाहून कुणालाच आनंद होत नाही,’ अशा शब्दांत त्यांनी बॉलिवूडमधील स्पर्धात्मक वातावरणावर टीका केली.
मनोज वाजपेयीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हिंदी चित्रपटसृष्टीतील वातावरणावर परखड मत मांडलं. त्याच्या मते, बॉलिवूडला एक मोठं कुटुंब किंवा कलाकारांची एकजूट असलेली इंडस्ट्री समजणं चुकीचं आहे. प्रत्यक्षात प्रत्येकजण आपापल्या कामात आणि स्पर्धेत गुंतलेला असतो. एखाद्या अभिनेत्याचा चित्रपट यशस्वी झाला, तर दुसऱ्या अभिनेत्याला त्याचा आनंद होतोच असं नाही. त्याचप्रमाणे एखाद्या दिग्दर्शकाला दुसऱ्या दिग्दर्शकाच्या यशामुळे स्वतःचं स्थान कमी झाल्यासारखं वाटू शकतं. निर्मिती संस्थांमध्येही अशीच स्पर्धा असल्याचं त्यांने सांगितलं. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये सर्वजण एकमेकांचे हितचिंतक असतात, ही अपेक्षा ठेवू नये, असं त्याचं म्हणणं आहे.
मनोज वाजपेयीने इंडस्ट्रीतील कलाकारांना स्वतःच्या संघर्षासाठी तयार राहण्याचा सल्लाही दिला. तुम्ही कितीही वर्षं चित्रपटसृष्टीत काम केलं, तरी प्रत्येक वेळी कुणीतरी तुमच्या मदतीला येईलच, याची खात्री नसते. त्यामुळे स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणं आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं आहे, असं तो म्हणाला. इंडस्ट्रीमध्ये अनेकदा एकजुटीच्या गोष्टी केल्या जातात. मात्र, प्रत्यक्षात प्रत्येकजण आपापल्या करिअरसाठी प्रयत्न करत असतो. कोणी मदतीसाठी पुढे आलं, तर तो चांगला दिवस समजावा, अशी स्पष्ट भूमिकाही त्याने मांडली.
अनेक वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत काम करूनही मनोज वाजपेयीला इंडस्ट्रीच्या सामाजिक वर्तुळाचा पूर्णपणे भाग असल्याची भावना वाटत नसल्याचं त्याने सांगितलं. बॉलिवूडमध्ये यश मिळवण्यासाठी विशिष्ट परिसरात राहणं किंवा ठरावीक लोकांशी ओळख असणं आवश्यक नाही, असंही त्याने स्पष्ट केलं.
मनोज वाजपेयी सध्या त्यांच्या ‘गजब रात’ या नेटफ्लिक्सवरील थ्रिलर चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट 23 ऑक्टोबर 2026 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांच्यासोबत दिव्या दत्ता आणि श्रद्धा दास यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान मनोजने हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना ठराविक प्रकारच्या भूमिकांमध्ये अडकवण्याच्या प्रवृत्तीवरही भाष्य केलं होतं. त्याच्या मते, कलाकारांना त्याच्या क्षमतेनुसार संधी न दिल्यामुळे अनेक प्रतिभावान कलाकारांच्या कौशल्याचा पुरेपूर वापर होत नाही. स्वतःच्या अभिनयक्षमतेचाही केवळ 25 टक्के भाग वापरला गेल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
