Video : जरा हटकेच… चालत्या बाइकवरून एका हाताने घेतला कॅच, पाकिस्तानी तरुण झाला रातोरात व्हायरल
पाकिस्तानातील मेहरान खान हा तरुण चालत्या बाईकवरून एका हातात क्रिकेटचा अविश्वसनीय झेल पकडून रातोरात प्रसिद्ध झाला. स्वात प्रीमियर लीगमध्ये षटकार मारलेला चेंडू मैदानाच्या बाहेर येत असताना त्याने हे धाडस दाखवले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि या अनोख्या पराक्रमाबद्दल त्याला बक्षीस देखील मिळाले.

कुणाला कशी आणि कधी प्रसिद्धी मिळेल याचा काही नेमच नसतो. कधी कधी क्रिकेटच्या मैदानात घाम गाळून, प्रचंड मेहनत करूनही प्रसिद्धी मिळत नाही. नशिब फळफळत नाही. पण मैदानाच्या बाहेर राहूनही पाकिस्तानातील एक तरुण चांगलाच जगप्रसिद्ध झाला आहे. हा तरूण मैदानाच्या बाहेरून बाइकने चालला होता. इतक्यात एक चेंडू वेगाने आला, या तरुणाने चालत्या बाइकवर असतानाच एका हाताने कॅच पकडली. कोणतीच तयारी नाही, काहीच ध्यानीमनी नसताना त्याने ही कॅच पकडून सर्वांनाच चकीत करून सोडलं आहे. त्याच्या या हटके आणि अनोख्या कारन्याम्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हा तरुण रातोरात प्रसिद्ध झाला आहे.
पाकिस्तानच्या स्वात परिसरातील मिंगोरा येथे स्वात प्रीमियर लीग सुरू होती. यावेळी ही घटना घडली. एका फलंदाजाने उत्तुंग षटकार लगावला. त्याने इतक्या जोरात चेंडू टोलवला की चेंडू थेट स्टेडियमच्या बाहेर गेला. त्यावेळी रस्त्यावरून मेहरान खान जात होता. तो आपल्या एका मित्रासोबत बाइकवरून जात होता. अचानक त्याचं लक्ष चेंडूकडे गेलं आणि त्याने चालत्या बाइकवरूनच चेंडू पकडला.
चेंडू आपल्याकडे येत असल्याचं पाहून मेहरानने त्याच्या मित्राला डोकं खाली घ्यायला सांगितलं. त्यानंतर त्याने स्वत: हात पुढे करून चेंडू पकडला. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्याने बाइकवरून न उतरता एका हाताने चेंडू पकडला. त्यावेळी अनेकांनी हे दृश्य पाहिलं आणि त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.
A crowd catch… from the back of a moving motorbike?! 🏍️🤯 https://t.co/BiMCek5itg
— Pitch Report (@Cric_freak_18) November 25, 2026
त्याचाही विश्वास बसेना…
त्यानंतर मेहरानने बीबीसीशी संवाद साधला. मला क्रिकेट आवडतं. मी स्वत: क्रिकेट खेळतो. मॅच सुरू असताना मी फलंदाजी पाहत होतो. फलंदाजाने छक्का मारताच त्याचा चेंडू माझ्याकडे येत असल्याचं मला दिसलं. तेव्हा मी बाइक चालवत होतो. माझ्यासोबत बाइकवर असलेल्या मित्राला खाली वाकायला सांगितलं आणि मी स्वत: कॅच पकडली. मी चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला. पण खरोखरच कॅच पकडली जाईल याचा मला विश्वासच बसेना. मला वाटलं चेंडू आजूबाजूला कुठे तरी पडेल. पण शेवटी मी चेंडू पकडण्यात यशस्वी झालो, असं मेहरानने सांगितलं.
10 हजार रुपयांचं बक्षीस
मेहरानने ही कॅच पकडल्यानंतर याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्यालाही असा काही कारनामा होईल याचा अंदाज नव्हता. त्याचा हा छोटासा कारनामा होता. पण त्याची जगभर चर्चा सुरू आहे. आपला हा व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाल्याचं त्याला दुसऱ्या दिवशी समजलं. विशेष म्हणजे, मेहरानच्या या शानदार कारनाम्यावर प्रीमियर लीगचे आयोजकही खूश झाले. त्यांनी मेहरानला 10 हजार पाकिस्तानी रुपये बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली. ही रक्कम पाकिस्तानी आर्मीकडून दिली जाणार आहे. ही रक्कम भारतीय करन्सीत मोजल्यास 3,350 रुपये होतात.
