AB De Villiers : डिव्हिलियर्सचे हात शिवशीवले, पुन्हा संघात येण्यासाठी उत्सुक

| Updated on: Jun 06, 2019 | 4:43 PM

सध्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेची स्थिती वाईट आहे. तीनही सामन्यात आफ्रिकेचा पराभव झाला.

AB De Villiers : डिव्हिलियर्सचे हात शिवशीवले, पुन्हा संघात येण्यासाठी उत्सुक
Follow us on

मुंबई : क्रिकेट जगतात मिस्टर 360 अशी ओळख असलेला दक्षिण आफ्रिकेचा माजी धडाकेबाज फलंदाज ए बी डिव्हिलियर्सचे हात शिवशीवत असल्याचं दिसत आहे. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलेल्या एबीडीला पुन्हा आफ्रिकेच्या संघात परतायचं आहे. सध्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेची स्थिती वाईट आहे. तीनही सामन्यात आफ्रिकेचा पराभव झाला. मात्र डिव्हिलियर्सने वर्ल्डकपच्या सुरुवातीलाच संघ व्यवस्थापनाला टीममध्ये परतण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र टीम मॅनेजमेंटने त्याला नकार दिला.

डिव्हिलियर्सने वर्ल्डकपच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय संघात परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र संघ व्यवस्थापनाने आफ्रिकन संघाची वर्ल्डकपसाठी निवड करताना डिव्हिलियर्सची ऑफर फेटाळली होती. डिव्हिलियर्सने मे महिन्यात मॅनेजमेंटला ऑफर दिली होती.

डिव्हिलियर्सने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ ड्यु प्लेसिस, प्रशिक्षक ओटिस गिब्सन आणि निवड समितीचे संयोजक लिंडा जोंदी यांच्याकडे वर्ल्डकपमध्ये खेळण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र त्यांनी त्याला नकार दिला. डिव्हिलियर्सच्या प्रस्तावावर विचारही झाला नाही.

डिव्हिलियर्सची ऑफर का नाकारली?

दोन कारणांमुळे डिव्हिलियर्सची ऑफर फेटाळण्यात आली. एक म्हणजे डिव्हिलियर्सने विश्वचषकाच्या एक वर्षापूर्वी मे 2008 मध्ये निवृत्ती घेतली होती. त्यामुळे तो निवडप्रक्रियेत बसत नव्हता. जर त्याची निवड झाली असती, तर अन्य खेळाडूंवर अन्याय झाला असता, असं मॅनेजमेंटचं म्हणणं आहे.

आफ्रिकेची पराभवाची हॅटट्रिक

सध्या विश्वचषकाच्या पहिल्या तीनही सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडने, दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने आणि तिसऱ्या सामन्यात भारताने पराभूत केलं. त्यातच डेल स्टेन दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर पडला आहे. त्यामुळे आफ्रिकेची कामगिरी ढासळली आहे.

अशा परिस्थितीत जर डिव्हिलियर्स संघात परतला असता, तर आफ्रिकेला नवसंजीवनी मिळाली असती, अशी चाहत्यांची धारणा आहे. डिव्हिलियर्सने वन डे करिअरमध्ये 53.30 च्या सरासरीने 9577 धावा केल्या आहेत. सर्वात वेगवान शतक आणि 150 धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.