Ashes | बेन स्टोक्स 5 तास लढला, लाखमोलाची 1 धाव करुन जॅक लीच ऑस्ट्रेलियाला नडला!

| Updated on: Aug 26, 2019 | 10:46 AM

इंग्लंडचा ऑलराऊंडर बेन स्टोक्सच्या (Ben Stokes) नाबाद 135 धावा आणि जॅक लीचची (Jack Leach) लाखमोलाची नाबाद 1 धाव यामुळे ऑस्ट्रेलियाचा घशातला विजयाचा घास अक्षरश: खेचून आणला.

Ashes | बेन स्टोक्स 5 तास लढला, लाखमोलाची 1 धाव करुन जॅक लीच ऑस्ट्रेलियाला नडला!
Follow us on

(Ashes) लंडन :  क्रिकेटला अनिश्चततेचा खेळ का आहे हे अॅशेस कसोटी मालिकेतील (Ashes) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (England vs Australia) यांच्यातील तिसऱ्या कसोटीत पुन्हा एकदा सिद्ध झालं. इंग्लंडचा ऑलराऊंडर बेन स्टोक्सच्या (Ben Stokes) नाबाद 135 धावा आणि जॅक लीचची (Jack Leach) लाखमोलाची नाबाद 1 धाव यामुळे ऑस्ट्रेलियाचा घशातला विजयाचा घास अक्षरश: खेचून आणला. इंग्लंडने अवघ्या 1 विकेटने हा सामना जिंकून या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

स्टोक्स आणि लीचने शेवटच्या विकेटसाठी तब्बल 76 धावांची भागीदारी रचली.  इंग्लंडसमोर विजयासाठी 359 धावांचं भलंमोठं लक्ष्य होतं. इंग्लंडच्या 9 विकेट्स 286 धावांत गेल्या होत्या. त्यामुळे ही कसोटी जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला केवळ 1 विकेट हवी होती. मात्र बेन स्टोक्स पुन्हा एकदा वाघासारखा लढला. त्याला लीचने जबरदस्त साथ दिल्याने, इंग्लंडने विजय अक्षरश: खेचून आणला.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 179 धावा केल्या होत्या. मग ऑस्ट्रेलियाने इंग्लंडलाच पहिला डाव अवघ्या 67 धावात गुंडाळला. त्यानंतर कांगारुंनी दुसऱ्या डावात 246 धावा केल्याने, इंग्लंडसमोर विजयासाठी 359 धावांचं भलमोठं लक्ष्य होतं.

इंग्लंडने चौथ्या दिवशी खेळाची सुरुवात 3 बाद 156 धावांवरुन केली. कर्णधार जो रुटने धावसंख्येत दोनची भर घालून तो 77 धावांवर माघारी परतला. मग स्टोक्सने बेयरस्ट्रोसोबत पाचव्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी रचली. बेयस्ट्रो बाद झाल्यानंतर इंग्लंडचा डाव अडखळला. उपहारानंतर अवघ्या 48 धावात इंग्लंडचे पाच फलंदाज तंबूत परतले. इंग्लंडची नववी विकेट 286 धावांवर गेली. त्यावेळी इंग्लंडला विजयासाठी 73 धावांची गरज होती. शेवटच्या विकेटने 73 धावा करणं अश्यकप्राय गोष्ट होती. मात्र स्टोक्सने ते शक्य करुन दाखवलं.

जवळपास 5 तास टिच्चून उभा राहिलेल्या स्टोक्सने पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर चौकार ठोकून ऐतिहासिक विजय मिळवून दिला. स्टोक्सने 219 चेंडूत 11 चौकार आणि 8 षटकारांसह 135 धावा केल्या.

स्टोक्सला लीचने जबरदस्त साथ दिली. स्टोक्स खेळेल हा विश्वास होताच, पण लीचने उभं राहावं अशी अपेक्षा तमाम इंग्लंडवासियांची होती. लीचनेही करुन दाखवलं. त्याने 17 चेंडूत केवळ 1 धाव केली. तासभर तो मैदानात नांगर टाकून उभा राहिला. त्यामुळेच स्टोक्सला लीचच्या साथीने विजयाचं तोरण बांधता आलं.

लीचला आयुष्यभरासाठी चष्मे फ्री

दरम्यान, लीचच्या लाखमोलाच्या एका धावेमुळे अॅशेसची ऑफिशिअल स्पॉन्सर कंपनी Specsavers ने त्याला आयुष्यभरासाठी चष्मे देण्याची घोषणा केली आहे. जॅक लीच हा बॅटिंगदरम्यान चष्मा पुसताना दिसत होता. मॅच संपल्यानंतर Specsavers ने ट्विट करुन त्याला आयुष्यभरासाठी चष्मे देऊ असं जाहीर केलं.