रात्रभर जागून BCCI चे नटराजन-इशांतबाबत मोठे निर्णय, रोहितच्या फिटनेसबाबत महत्त्वाची अपडेट

| Updated on: Nov 27, 2020 | 8:45 AM

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जलदगती गोलंदाज टी. नटराजन आणि इशांत शर्मा यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

रात्रभर जागून BCCI चे नटराजन-इशांतबाबत मोठे निर्णय, रोहितच्या फिटनेसबाबत महत्त्वाची अपडेट
या खेळाडूने टीम इंडियाकडून खेळताना एकूण 20 एकदिवसीय सामन्यात 13 विकेट्स घेतल्या आहेत
Follow us on

मुंबई : मध्यरात्री सर्व भारतीय गाढ झोपेत असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात व्यस्त होतं. बीसीसीआयने केवळ निर्णय घेतले नाहीत, तर त्या नियमांची अंमलबजावणीदेखील केली आहे. बीसीसीआयने जलदगती गोलंदाज टी. नटराजन (T Natarajan) आणि इशांत शर्मा (Ishant Sharma) यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत (India Tour of Australia) दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. (BCCI decided to add T Natarajan in India’s ODI squad and ruled out Ishant Sharma from test series against australia)

ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका सुरु होण्याच्या आदल्या रात्री बीसीसीआयने डावखुरा जलदगती गोलंदाज टी. नटराजन याच्या भारताच्या एकदिवसीय संघातील निवडीबाबत निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नटराजनचं भारताच्या एकदिवसीय संघासाठी खेळण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण बीसीसीआयने त्याचा एकदिवसीय संघात समावेश केला आहे. नटराजनची भारताच्या टी-20 संघात यापूर्वीच निवड करण्यात आली आहे. तसेच बीसीसीआयचा दुसरा निर्णय जलदगती गोलंदाज इशांत शर्माबाबत आहे. बीसीसीआयने इशांतला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळलं आहे. इशांतची दुखापत हे यामागचं मुख्य कारण असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

नवदीपच्या जागी नटराजनची वर्णी

एकदिवसीय मालिका सुरू होण्यापूर्वी जलदगती गोलंदाज नवदीप सैनीच्या पाठिला दुखापत झाली आहे. तो एकदिवसीय मालिका खेळू शकणार की नाही याबाबत सांशकता आहे. त्यामुळेच एकदिवसीय संघात सैनीच्या जागी नटराजनला संघात स्थान देण्यात आले आहे. संघात एका डावखुऱ्या जलदगती गोलंदाजाची गरज होती, नटराजनच्या निवडीने ती पूर्ण झाली आहे.

इशांत शर्मा बॉर्डर-गावस्कर स्पर्धेतून बाहेर

इशांत शर्माला बॉर्डर-गावस्कर चषक स्पर्धा म्हणजेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आले आहे. बीसीसीआयने याबाबत म्हटले आहे की, इशांत अद्याप पूर्णपणे फिट झालेला नाही. कसोटी मालिकेचा ताण घेऊ शकेल इतका फिटनेस अद्याप नसल्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आले आहे.

बीसीसीआयने यावेळी धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माच्या फिटनेसबाबतही अपडेट दिली. बीसीआयने सांगितले आहे की, 11 डिसेंबरला रोहित शर्माची फिटनेस टेस्ट होणार आहे. त्यानंतरच रोहित कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला जाणार की नाही, याबाबत निर्णय घेतला जाईल. तसेच बीसीसीआयने यावेळी सांगितले की, वडिल आजार असल्यामुळे आयपीएल संपताच रोहित मुंबईत परत आला होता. त्याच्या वडिलांची तब्येत आता बरी असून रोहित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये जाऊन फिटनेस ट्रेनिंग सुरु करणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

एकदिवसीय (वनडे) मालिका
पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी
दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी
तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल

ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ

एरॉन फिंच (कर्णधार), सीन एबोट, एश्टन एगर, अॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, मोइजेस हेनरिक्स, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, डेनियल सॅम्स, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ , मिचेल स्टॉर्क, मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वार्नर आणि अॅडम झॅम्पा

भारताचा एकदिवसीय संघ

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार&विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, टी. नटराजन