चेतेश्वर पुजारा आता भारतासाठी नाही खेळणार; भावूक पोस्ट लिहित संन्यास जाहीर

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराने संन्यास जाहीर करून सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. यासंदर्भात त्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. चेतेश्वर टेस्ट मॅचेसमधील दमदार कामगिरीसाठी ओळखला जातो.

चेतेश्वर पुजारा आता भारतासाठी नाही खेळणार; भावूक पोस्ट लिहित संन्यास जाहीर
चेतेश्वर पुजारा
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 24, 2025 | 12:11 PM

भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू चेतेश्वर पुजाराने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून संन्यास घेतला आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याने याबद्दलची माहिती दिली. पुजाराने इन्स्टाग्रामवर भलीमोठी पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्या आहेत. चेतेश्वरने टीम इंडियासाठी 100 हून अधिक टेस्ट मॅचेस खेळल्या आहेत. टेस्ट स्पेशलिस्ट म्हणून तो ओळखला जायचा. भारतीय टेस्ट टीममधील सर्वांत विश्वसनीय बॅट्समन म्हणून चेतेश्वर पुजाराकडे पाहिलं जायचं.

चेतेश्वरने ऑक्टोबर 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट क्रिकेटमधून कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने मुख्य रुपात टेस्ट क्रिकेटमध्येच आपली ओळख बनवली. पुजारा टॉप-ऑर्डरमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळत होता. त्याने 100 हून अधिक टेस्ट मॅचेस खेळल्या आहेत. तर 7000 हून अधिक धावा आणि जवळपास 19 शतकं त्याच्या नावावर आहेत. परंतु ODI आणि T20 मध्ये त्याला फारसं यश मिळालं नाही.

37 वर्षीय पुजाराने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं, ‘भारतीय जर्सी घालणं, राष्ट्रगीत गाणं आणि प्रत्येक वेळी मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करणं.. हे शब्दांमध्ये मांडणं खूप कठीण आहे. परंतु जसं म्हणतात की, प्रत्येक चांगल्या गोष्टीचा अंत असतो. मी मनापासून आभारी आहे आणि सर्व फॉरमॅटच्या क्रिकेटला रामराम करण्या निर्णय घेतला आहे.’

‘माझा क्रिकेटचा प्रवास सुरू केला, तेव्हा हा खेळ मला इतकं काही देईल याची मी कल्पनासुद्धा केली नव्हती. संधी, अनुभव, जीवनाचा उद्देश, प्रेम आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे माझ्या राज्याचं आणि या महान देशाचं प्रतिनिधित्व करण्याचा अभिमान. भारताची जर्सी घालणं, राष्ट्रगीत गाणं आणि मैदानावर प्रत्येकवेळी स्वत:ला झोकून देऊन खेळणं.. हा सर्व अनुभव शब्दांत मांडता येणार नाही. पण जसं म्हणतात ना, की प्रत्येक चांगल्या गोष्टीचा अंत होतो. त्यामुळे मनात कृतज्ञतेची भावना ठेवून मी भारतीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅट्समधून निवृत्त होत आहे’, अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या आहेत.

चेतेश्वर पुजाराची कसोटीमधील कारकिर्द अत्यंत प्रभावी होती. त्याने भारतासाठी 103 कसोटी सामन्यांमध्ये 43.60 च्या सरासरीने 7195 धावा केल्या आहेत. यात 19 शतकं आणि 35 अर्धशतकं केली. पुजाराने 2023 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर त्याला टीम इंडियातून वगळण्यात आलं होतं.