धोनी नोबॉलवर आऊट? अम्पायरच्या निर्णयावर चाहत्यांचा संताप

| Updated on: Jul 11, 2019 | 11:29 AM

ज्या महेंद्रसिंग धोनीच्या विकेटवर सामना फिरला ती विकेटच चुकीची असल्याचा दावा काही क्रिकेटप्रेमींनी केला आहे. याबाबत सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

धोनी नोबॉलवर आऊट? अम्पायरच्या निर्णयावर चाहत्यांचा संताप
Follow us on

लंडन: आयसीसी विश्वचषक 2019 मध्ये प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या भारतीय संघाचे आव्हान सेमीफायनलमध्ये संपले. सेमीफायनलच्या सामन्यात न्यूझीलंडने भारताला 18 धावांनी पराभूत केले. मात्र, ज्या महेंद्रसिंग धोनीच्या विकेटवर सामना फिरला ती विकेटच चुकीची असल्याचा दावा काही क्रिकेटप्रेमींनी केला आहे. याबाबत सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यात अम्पायरने नो बॉलवर धोनीला आऊट दिल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे.

एका युजरने संबंधित व्हिडीओ शेअर करताना न्यूझीलंडने पॉवर प्लेचे नियम मोडल्याचे म्हटले. तो युजर म्हणाला, “अम्पायरने धोनीला धावबाद देताना पावर प्लेच्या नियमांच्या उल्लंघनाकडे दुर्लक्ष केले आहे. तिसऱ्या पॉवर प्लेमध्ये मैदानावरील निश्चित वर्तुळाबाहेर जास्तीत जास्त 5 खेळाडू बाहेर राहू शकतात. मात्र, धोनी धावबाद देण्यात आला तेव्हा 30 यार्ड वर्तुळाबाहेर 6 खेळाडू होते.

एका युजरने सामन्यातील अम्पायरिंगवर टीका केली. तो म्हणाला, “किती चांगली अम्पायरिंग आहे ही? तो नोबॉल असल्याने महेंद्रसिंग धोनीला धावबाद द्यायला नको होते. धोनीने खेळायला हवे होते आणि भारताने जिंकायला हवे होते. किती महान विश्वचषक आहे? किती महान अम्पायरिंग आहे.

अन्य एका युजरने लिहिले, “मी एकटाच आहे का ज्याला हे दिसलं आहे? धोनी धावबाद झाला तेव्हा मैदानावरील 30 यार्ड वर्तुळाबाहेर 6 खेळाडू होते. हा अम्पायरिंगचा दोष आहे की जीपीएसची त्रुटी? माहिती नाही. धोनी अजूनही आऊट आहे?

पॉवर प्ले 3 च्या फिल्डिंगचे नियम काय?

पॉवर प्लेच्या नियमांनुसार तिसरे पॉवर प्लेत मैदानावरील 30 यार्ड वर्तुळाबाहेर जास्तीत जास्त 5 खेळाडू उभे करता येतात. मात्र, सोशल मीडियावर फिरत असणाऱ्या व्हिडीओत धोनी बाद झाला तेव्हा 6 खेळाडू असल्याचे दिसत आहे. मात्र, तो नोबॉल जरी असता तरी धोनी बादच धरला गेला असता. नो बॉलवर झेलबाद किंवा इतर पद्धतीने बाद गृहित धरले जात नसले, तरी नोबॉलवर धावबाद ग्राह्य धरले जाते. त्यामुळे अम्पायरने तो चेंडू नोबॉल जरी ठरवला असता तरी धोनी बादच घोषित करण्यात आला असता.

भारताला शेवटच्या 2 षटकांमध्ये 31 धावांची आवश्यकता होती. तेव्हा धोनी भारतासाठी शेवटची आशा होता. धोनीने त्या षटकात पहिल्या चेंडूवर षटकार लगावला. त्यानंतरच्या चेंडूवर धोनी 2 धावांसाठी पळाला आणि धावबाद झाला.  मार्टिन गप्टिलने धोनीला ‘डायरेक्ट हिट’ करत बाद केले. धोनीने 72 चेंडूंमध्ये एक षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 50 धावा केल्या.