
टी 20i आशिया कप 2025 स्पर्धेची सांगता झाली आहे. टीम इंडियाने 28 सप्टेंबरला पाकिस्तानला पराभूत करत आशिया ट्रॉफी जिंकली. टीम इंडिया या विजयानंतर मायदेशात वेस्ट इंडिज विरुद्ध 2 ऑक्टोबरपासून 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. तर उपविजेता पाकिस्तान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 मॅचची टेस्ट सीरिज खेळणार आहे. या मालिकेला 12 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला आशियातील 2 संघ यूएईत एकमेकांविरुद्ध टी 20i आणि एकदिवसीय मालिकेत भिडण्यासाठी सज्ज झाले आहेत.
यूएईत अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात टी 20i आणि एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. दोन्ही मालिकेत प्रत्येकी 3-3 सामने खेळवण्यात येणार आहे. उभयसंघातील सामन्यांना टी 20i मालिकेने सुरुवात होणार आहे. टी 20i मालिकेचा थरार 2 ते 5 ऑक्टोबर दरम्यान रंगणार आहे. सलामीचा सामना हा 2 ऑक्टोबरला होणार आहे. टी 20i मालिकेतील तिन्ही सामने हे शारजाहमध्येच होणार आहेत. त्यामुळे दोन्ही संघांचा प्रवासाचा वेळ आणि त्रास वाचणार आहे. राशिद खान अफगाणिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तर जाकेर अली याच्याकडे बांगलादेशच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे.
बांगलादेशचा नियमित टी 20i कर्णधार लिटन दास याला आशिया कप स्पर्धेत दुखापतीमळे सुपर 4 फेरीतील सामन्याला मुकावं लागलं. लिटन अजूनही बरा झालेला नाही. त्यामुळे लिटनला अफगाणिस्तान विरूद्धच्या मालिकेलाही मुकावं लागलं आहे. त्यामुळे जाकेरच अफगाणिस्तान विरुद्ध नेतृत्व करणार आहे.
पहिला सामना, 2 ऑक्टोबर, शारजाह
दुसरा सामना, 3 ऑक्टोबर, शारजाह
तिसरा सामना, 5 ऑक्टोबर, शारजाह
टी 20i नंतर उभयसंघातील एकदिवसीय मालिकेला 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर सुरुवात होईल. सलामीचा सामना 8 ऑक्टोबरला होईल. दुसरा सामना 11 ऑक्टोबरला खेळवण्यात येईल. तर तिसरा आणि अंतिम सामना हा 14 ऑक्टोबरला पार पडेल. हे तिन्ही सामने अबुधाबीतील शेख झायेद स्टेडियममध्ये होणार आहेत.
बी ग्रुपमध्ये असलेल्या अफगाणिस्तानचं आव्हान हे साखळी फेरीतच संपुष्ठात आलं. अफगाणिस्तानने हाँगकाँगवर मात करत विजयी सलामी दिली. मात्र त्यानंतर बांगलादेशने आणि श्रीलंकेने अफगाणिस्तानला साखळी फेरीत पराभूत केलं. श्रीलंकेविरुद्धच्या पराभवासह अफगाणिस्तानचं पॅकअप झालं.
तर बांगलादेशने साखळी फेरीत अफगाणिस्तान आणि हाँगकाँगला पराभूत करत सुपर 4 फेरीत धडक दिली होती. तर श्रीलंकेने अफगाणिस्तानला पराभूत केल्याने बांगलादेशला सुपर 4 मध्ये पोहचण्याची आयती संधी मिळाली. त्यानंतर बांगलादेशने श्रीलंकेला सुपर 4 मध्ये पराभूत करत मोठा झटका दिला. मात्र टीम इंडिया आणि त्यानंतर पाकिस्तानने पराभूत करत बांगलादेशचं सुपर 4 मधून पॅकअप केलं.