
भारतीय संघ सध्या विश्वचषक स्पर्धेमध्ये असून विश्वचषकाचा अंतिम सामना 14 नोव्हेंबर रोजी झाल्यानंतर लगेचच भारतीय क्रिकेट संघ विविध अशा चार देशांना भारतात खेळण्यासाठी घेऊन येणार आहे. यामध्ये न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या संघाचा समावेश आहे. या सर्वात पहिलाच दौरा असणाऱ्या न्यूझीलंड संघाविरुद्ध भारतीय टी20 संघाची घोषणा विश्वचषकानंतर लगेचच होणार आहे. यावेळी कर्णधार म्हणून केएल राहुलचं नाव चर्चेत असून संघातील काही दिग्गज खेळाडूंना वगळलं जाण्याची दाट शक्यता आहे.

यंदाचा विश्वचषक भारतासाठी खास नसला तरी पुढील टी20 वर्ल्ड कपला केवळ 11 महिने शिल्लक आहेत. अशावेळी आगामी मालिकांमधून उत्तम खेळाडू निवडण्यासाठी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देण्यात येईल. यासाठी काही मोठी नावं संघाबाहेर होऊ शकतात. यातील दोन नाव म्हणजे हार्दिक पंड्या आणि भुवनेश्वर कुमार. दोघेही आऊट ऑफ फॉर्म असण्यासह दुखापतींनी ग्रस्त असल्याने संघ व्यवस्थापन त्यांना विश्रांती देऊ शकतं.

यावेळी दिग्गजांच्या जागी संघात युवांना संधी दिली जाईल. यासाठी हार्दिकच्या जागी ऋतुराज गायकवाड तर भुवीच्या जागी आवेश खानला संधी दिली जाऊ शकते. तसंच बुमराहला विश्रांती देण्यासाठी अनुभवी चहलला संघात स्थान दिलं जाऊ शकतं. याशिवाय आयपीएल गाजवणाऱ्या वेंकटेश अय्यरलाही संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

या साऱ्यांसह भारताला वेगवान गोलंदाजाची गरज असल्याने नुकताच आय़पीएल डेब्यू करणाऱ्या काश्मिरच्या उम्रान मलिकला संधी दिली जाऊ शकते. त्याने यंदाच्या आयपीएलमधील सर्वात वेगवान चेंडू टाकला होता. याशिवाय श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, दिपक चाहर यांचही संघात पुनरागमन होऊ शकतं.