
रिंकु सिंह आयपीएल 2023 स्पर्धेपासून चर्चेत आला. पाच चेंडूत पाच षटकार मारून त्याने लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतर त्याच्या क्रिकेट करिअरचा चढता आलेख पाहायला मिळाला. आयर्लंड दौऱ्यापासून रिंकु सिंहच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दिला सुरुवात झाली. पण कधी संघात, तर कघी संघाबाहेर राहावं लागलं. मधल्या फळीत एक मजबूत खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. श्रीलंका दौऱ्यात रिंकूने षटक टाकलं होतं. तसेच दोन विकेटही घेतल्या होत्या. सातत्याने चांगली कामगिरी केल्यानंतरही रिंकु सिंहची टी20 वर्ल्डकप संघात निवड झाली नाही. त्याला राखीव खेळाडू म्हणून निवडलं होतं. त्यानंतर संघ व्यवस्थापनावर जोरदार टीक झाली होती. टीम इंडियाने जेतेपद मिळवलं आणि या वादावर पडदा पडला. पण टी20 वर्ल्डकप संघातून डावललं गेल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने रिंकु सिंहशी चर्चा केली होती. याबाबतचा खुलासा खुद्द रिंकु सिंहने केला आहे.
न्यूज 24 ला दिलेल्या मुलाखतीत रिंकु सिंहने सांगितलं की, ‘हा, तो (रोहित शर्मा) समजवण्यासाठी आला होता. नाराज होऊ नको, तुझं आता वय तरी काय आहे? वर्ल्डकप पुढे खूप आहेत. मेहनत करत राहा. दर दोन वर्षांनी वर्ल्डकप येतो, त्याच्यावर लक्ष केंद्रीत कर. काहीच अडचण नाही, त्रास करून घेऊ नको.’ टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर रिंकु सिंहची निवड झिम्बाब्वे आणि श्रीलंका दौऱ्यासाठी झाली होती. तर श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून डावलण्यात आलं होतं. दुसरीकडे, दुलीप ट्रॉफीत त्याची निवड झालेली नाही.
रिंकु सिंहने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. उत्तर प्रदेशसाठी 55 पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आहेत. सध्या रिंकु सिंह युपी प्रीमियर 2024 स्पर्धेत मेरठ मावेरिक्स संघाचा कर्णधार आहे. रिंकुच्या संघाने रविवारी लखनऊमध्ये काशी रुद्रा संघाचा 7 विकेट पराभव केला आणि स्पर्धेत सकारात्मक सुरुवात केली. दुसरीकडे, रिंकु सिंहला आयपीएल 2025 स्पर्धेत कोलकाता रिटेन करणार की नाही याची चर्चा रंगली आहे. जर रिंकुला रिलीज केलं तर लिलावात मोठी रक्कम मिळू शकते.