अनिरुद्ध रविचंदर आणि काव्या मारन यांच्या लग्नाची धामधूम सुरू! अनेक दिग्गज ग्रीसला रवाना
सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणारी सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन हिच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

दाक्षिणात्य संगीतविश्वातील लोकप्रिय संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि सनरायझर्स हैदराबादची CEO काव्या मारन यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. दोघांच्या लग्नसोहळ्याला आता सुरुवात झाली असून, या खास सोहळ्यासाठी मनोरंजन, राजकारण आणि उद्योगविश्वातील अनेक दिग्गज मंडळी ग्रीसला पोहोचणार आहेत. विशेष म्हणजे, सुपरस्टार रजनीकांत यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी या लग्नासाठी ग्रीसचा प्रवास सुरू केला आहे.
कोण कोण राहणार उपस्थित?
अनिरुद्ध आणि काव्या यांच्या लग्नाची बातमी समोर आल्यापासून चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. सुपरस्टार रजनीकांत आपल्या कुटुंबीयांसह या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ग्रीसला रवाना झाले आहेत. त्यांच्या विमानतळावरील व्हिडीओंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. दुसरीकडे, तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. के. स्टालिन हेदेखील पत्नी दुर्गा स्टालिन आणि मुलगा उदयनिधी स्टालिन यांच्यासह ग्रीसला जाण्यासाठी रवाना झाल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. यावेळी स्टालिन फॉर्मल लूकमध्ये, तर उदयनिधी कॅज्युअल अंदाजात दिसले.
पाहुण्यांसाठी चार खासगी विमानांची व्यवस्था
मिळालेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनिरुद्ध आणि काव्या यांचा विवाहसोहळा ११ नोव्हेंबर २०२६ रोजी ग्रीसमध्ये पार पडणार आहे. हा विवाह अत्यंत खासगी स्वरूपात आयोजित करण्यात आला असून, त्यासाठी केवळ कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमंडळींनाच आमंत्रित करण्यात आले आहे. ‘फिल्मीबीट’च्या वृत्तानुसार, लग्नासाठी येणाऱ्या पाहुण्यांच्या प्रवासाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. पाहुण्यांना विवाहस्थळी पोहोचवण्यासाठी तब्बल चार खासगी विमानांची सोय करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
काव्या मारन या सन ग्रुपचे अध्यक्ष कलानिधी मारन यांच्या कन्या असून, त्या आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद संघाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. तर अनिरुद्ध रविचंदर यांनी आपल्या संगीताने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. सन पिक्चर्सच्या ‘बीस्ट’, ‘जेलर’, ‘कुली’ आणि ‘जेलर २’ यांसारख्या चित्रपटांसाठीही त्यांनी संगीत दिले आहे.
चेन्नईत रंगणार लग्नानंतरचा भव्य रिसेप्शन सोहळा?
ग्रीसमधील विवाहसोहळ्यानंतर अनिरुद्ध आणि काव्या यांच्या लग्नाचे भव्य रिसेप्शन चेन्नईमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. २१ नोव्हेंबर रोजी हा कार्यक्रम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या रिसेप्शनला चित्रपटसृष्टी, राजकीय क्षेत्र आणि उद्योगविश्वातील अनेक नामवंत व्यक्ती उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्यासह अभिनेत्री नयनतारा आणि अभिनेता धनुष यांच्या नावांचाही संभाव्य पाहुण्यांमध्ये समावेश असल्याचे वृत्त आहे.
एकूणच, अनिरुद्ध आणि काव्या यांच्या लग्नसोहळ्याकडे सध्या चाहत्यांसह संपूर्ण दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीचे लक्ष लागले आहे.