Asia Cup 2024 : शफाली वर्माने केली नेपाळच्या गोलंदाजांची धुलाई, 170 च्या स्ट्राईक रेटने केल्या धावा

महिला आशिया कप 2024 स्पर्धेत शफाली वर्माचा झंझावात पाहायला मिळाला. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी शफाली वर्माने नेपाळच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. शफाली वर्माने 26 चेंडूत 50 धावा ठोकल्या.

Asia Cup 2024 : शफाली वर्माने केली नेपाळच्या गोलंदाजांची धुलाई, 170 च्या स्ट्राईक रेटने केल्या धावा
| Updated on: Jul 23, 2024 | 8:39 PM

आशिया कप 2024 स्पर्धेत शफाली वर्मा नावाच्या वादळाचा नेपाळला तडाका बसला. नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि वादळी फटकेबाजीला सुरुवात झाली. शफाली वर्माने पहिल्या षटकापासूनच आक्रमक पवित्रा घेतला. पहिल्या चार चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने 9 धावा केल्या आणि आपला हेतू स्पष्ट केला. शफाली वर्माला गोलंदाजी करण्यासाठी नेपाळच्या कर्णधार सर्व यु्क्त्या वापरल्या. पण एकही युक्ती कामी आली नाही. शफाली वर्माचा झंझावात सुरुच होता, त्यामुळे नेपाळचे गोलंदाज पुरते हतबल झाले होते. शफाली वर्माने आपलं अर्धशतक 26 चेंडूत पूर्ण केलं. शफाली वर्माला शतक करण्याची संधी होती. मात्र तिने आपला आक्रमक पवित्रा काही सोडला नाही. सिता राणा मगरच्या गोलंदाजीवर पुढे येऊन खेळताना चूक झाली आणि यष्टीचीत झाली. शफाली वर्माने आपल्या खेळीत 11 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 48 चेंडूत 81 धावा केल्या. शफाली वर्मा आणि दयालन हेमलता या जोडीने पहिल्या विकेटसाठी 122 धावांची भागीदारी केली. दयालन हेमलता हीचं अर्धशतकं फक्त 3 धावांनी हुकलं.

आयसीसीने नुकतीच टी20 क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत शफाली वर्मा 11व्या स्थानावर आहे. मात्र आजच्या खेळीमुळे तिची वर्णी टॉप 10 मध्ये लागण्याची शक्यता. शफाली वर्माने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 40 आणि संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध 37 धावा केल्या होत्या. दरम्यान, टीम इंडियाने 20 षटकात 3 गडी गमवून 178 धावा केल्या. तसेच विजयासाठी 179 धावांचं आव्हान दिलं आहे. टीम इंडियाचं उपांत्य फेरीतील स्थान पक्कं झालं आहे. मात्र पाकिस्तानचं गणित या सामन्यावर अवलंबून होतं. मात्र नेट रनरेटमध्ये पाकिस्तान पुढे असल्याने नेपाळचं आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

नेपाळ महिला (प्लेइंग इलेव्हन) : समझ खड्का, सीता राणा मगर, कविता कुंवर, इंदू बर्मा (कर्णधार), डॉली भट्टा, रुबिना छेत्री, पूजा महतो, कविता जोशी, काजल श्रेष्ठ (विकेटकीपर), सबनम राय, बिंदू रावल.

भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, स्मृती मंधना (कर्णधार), दयालन हेमलता, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, एस संजना, राधा यादव, तनुजा कंवर, रेणुका ठाकूर सिंग, अरुंधती रेड्डी.