
आशिया कप 2025 स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात झाली. तर 16 सप्टेंबरपर्यंत एकूण 9 सामने खेळवण्यात आले आहेत. त्यामुळे आता सुपर 4 मध्ये पोहचण्यासाठी चुरस पाहायला मिळत आहे. बी ग्रुपमधून हाँगकाँग टीमचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं आहे. तर श्रीलंकेने 2 पैकी 2 सामने जिंकून सुपर 4 साठी दावा मजबूत केला आहे. तर अफगाणिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही संघांनी 2 पैकी प्रत्येकी 1-1 सामना जिंकला आहे. त्यामुळे या दोन्ही संघांसमोर साखळी फेरीतील आपला तिसरा आणि अंतिम सामना मोठ्या फरकाने जिंकण्याचं आव्हान असणार आहे.
पाकिस्तान आणि यूएई दोन्ही संघांनी ओमानला पराभूत करत साखळी फेरीतील आपला पहिलावहिला विजय मिळवला. मात्र टीम इंडियाने यूएई आणि पाकिस्तानवर मात करत सुपर 4 मध्ये धडक दिली आहे. त्यामुळे बी ग्रुपमधून सुपर 4 मध्ये पोहचण्यासाठी 1 जागा रिक्त आहे आणि दावेदार 2 आहेत. या एकमेव जागेसाठी पाकिस्तान आणि यूएई यांच्याच चुरस आहे. सुपर 4 मध्ये कोण पोहचणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.
सुपर 4 मधील एकमेव जागेसाठी ए ग्रुपमधील पाकिस्तान विरुद्ध यूएई यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. उभयसंघात बुधवारी 17 सप्टेंबरला हा सामना होणार आहे. या सामन्याला अबुधाबीतील शेख झायेद स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होईल. 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल. सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर सोनी लिव्ह एपद्वारे पाहता येईल.
पाकिस्तान आणि यूएईने 2 पैकी 1 सामना जिंकलाय. तर प्रत्येकी 1-1 सामना गमावला आहे. मात्र पाकिस्तानचा नेट रनरेट हा यूएईच्या तुलनेत कित्येक पटीने चांगला आहे. पाकिस्तानसाठी ही सर्वात मोठी आणि जमेची बाजू आहे. त्यामुळे पाकिस्तानला सुपर 4 चं तिकीट मिळवण्यासाठी फक्त विजय पुरेसा आहे. तर यूएईचं समीकरण वेगळं आहे. यूएईला सुपर 4 च्या दृष्टीने फक्त जिंकून चालणार नाही. यूएईला पाकिस्तानवर मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. जे अवघड आहे मात्र अशक्य नाही.
ताज्या आकडेवारीनुसार, टीम इंडिया ए ग्रुपमधील पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी आहे. टीम इंडियाने 2 पैकी 2 सामने जिंकले आहेत. भारतीय संघाचा नेट रनरेट हा +4.793 असा आहे. दुसऱ्या स्थानी पाकिस्तान आहे. पाकिस्तानच्या खात्यातील नेट रनरेट हा +1.649 असा आहे. यूएईचा नेट रनरेट हा मायनसमध्ये आहे. तिसऱ्या स्थानी असलेल्या यूएईचा नेट रनरेट हा -2.030 असा आहे.