
भारतीय क्रिकेट संघ व्यवस्थापनात काही तरी शिजत असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. बीसीसीआयने सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. येत्या एक दोन दिवसात याबाबत अधिकृत काय ते कळणार आहे. पण सध्यातरी या बातमीमुळे क्रीडावर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत माहिती घेण्यासाठी बीसीसीआय सचिव देवजित सैकिया यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी येत्या काही दिवसात याबाबत स्पष्ट काय ते कळेल असं सांगितलं. ‘तुम्हाला येत्या एक दोन दिवसात स्पष्ट आणि सविस्तर काय ते सांगू.’, असं सैकिया यांनी एका ओळीत सांगून टाकलं. अभिषेक नायर यांची आठ महिन्यांपूर्वी प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासोबत सहाय्यक कोच म्हणून निवड केली होती. पण त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच घरी जावं लागणार असं चित्र दिसत आहे.
बीसीसीआयने यापूर्वीच पुसटशी कल्पना दिल्याची चर्चा आता क्रीडावर्तुळात आहे. कारण प्रशिक्षक स्टाफमध्ये सितांशू कोटक यांची फलंदाजी कोच म्हणून नियुक्ती केली आहे. अभिषेक नायर संघासोबत असताना कोटक यांच्या नियुक्तीने तेव्हाच भुवया उंचावल्या होत्या. पण दोघंही चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान ड्रेसिंग रुमचा भाग होते. भारतीय संघ जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शिपच्या दृष्टीने हा दौरा खूपच महत्त्वाचा असणार आहे.
बीसीसीआयच्या सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, “ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर लगेचच बीसीसीआयने एक आढावा बैठक घेतली होती. त्यात सचिव देवजीत सैकिया आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्यासह बोर्डाचे उच्च अधिकारी, भारतीय संघाचे महत्त्वाचे सदस्य आणि राष्ट्रीय निवड समिती सदस्य उपस्थित होते. या बैठकीत, सपोर्ट स्टाफमधील एका वरिष्ठ सदस्याने नायरचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच ड्रेसिंग रूममध्ये नकारात्मक परिणाम होत असल्याचं सांगितलं होतं.’ बीसीसीआयने लगेच कारवाई केली नाही, पण त्यांनी कोटकला संघात घेतलंय चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान नायरला बाजूला करण्याचा मार्ग अवलंबला.