
दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाला 80 पेक्षा अधिक धावांच्या फरकाने पराभूत केलं. दक्षिण आफ्रिकेने यासह सलग दुसरा सामना जिंकत मालिका नावावर केली आहे. दक्षिण आफ्रिकेने यासह कांगारुंच्या पराभवाची परतफेड केली आहे. कांगारुंनी दक्षिण आफ्रिकेला टी 20I मालिकेत 2-1 ने पराभूत केलं होतं. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेने कांगारुंचा वनडे सीरिजमध्ये हिशोब केला आहे. दक्षिण आफ्रिकेने सलग दुसऱ्या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
लुंगी एन्गिडी, मॅथ्यू ब्रीट्झके आणि ट्रिस्टन स्टब्स या तिघांनी दक्षिण आफ्रिकेच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. मॅथ्यू आणि ट्रिस्टन या जोडीन केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेला 270 पार मजल मारता आली. त्यानंतर एकट्या लुंगीने 5 विकेट्स घेत कांगारुंच्या बॅटिंगचं कंबरडं मोडलं.
दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेला पूर्ण 50 ओव्हर खेळता आलं नाही. दक्षिण आफ्रिकेने 49.1 ओव्हरमध्ये ऑलआऊट 277 रन्स केल्या. मॅथ्यूने 78 बॉलमध्ये 2 फोर आणि 8 सिक्ससह 88 रन्स केल्या. तर ट्रिस्टन स्टब्स याने 87 चेंडूत 74 धावा जोडल्या. त्या व्यतिरिक्त टॉनी डी झॉर्जी 38, वियान मु्ल्डर 26 आणि केशव महाराज याने नाबाद 22 धावांचं योगदान दिलं. ऑस्ट्रेलियासाठी एडम झॅम्पा याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. झॅव्हीयर बार्टलेट, नॅथन एलिस आणि मार्नस लबुशेन या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर जोश हेझलवूड याने 1 विकेट मिळवली.
त्यानंतर 278 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या कांगारुंनी दक्षिण आफ्रिकेसमोर गुडघे टेकले. ऑस्ट्रेलियाला झटपट 3 झटके दिले. त्यामुळे कांगारु बॅकफुटवर गेले. मात्र जोश इंग्लिस आणि कॅमरुन ग्रीन या दोघांनी कांगारुंना सामन्यात कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र जोश आणि कॅमरुन दोघे आऊट होताच इतर फलंदाजही ढेर झाले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचं 37.4 ओव्हरमध्ये 193 धावांवर पॅकअप झालं.
जोश इंग्लिस याने सर्वाधिक 87 धावा केल्या. तर कॅमरुन ग्रीनने 35 धावांचं योगदान दिलं. या दोघांव्यतिरिक्त एकालाही 20 पार जातं आलं नाही. दक्षिण आफ्रिकेसाठी लुंगी एन्गिडी याने सर्वाधिक 5 विकेट्स मिळवल्या. तर नांद्रे बर्गर आणि सेनुरन मुथुसामी या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर वियान मुल्डर याने 2 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली. तसेच उभयसंघातील तिसरा आणि अंतिम क्रिकेट सामना हा रविवारी 24 ऑगस्टला होणार आहे.