
दक्षिण आफ्रिकने तिसऱ्या आणि अंतिम टी 20i सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर 173 धावांचं आव्हान ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियासाठी कॅप्टन मिचेल मार्श आणि त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल याने केलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीमुळे सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत गेला. 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत असल्याने शेवटची ओव्हर निर्णायक ठरणार होती. शेवटच्या ओव्हरमध्ये मालिका विजेता ठरणार होता. ऑस्ट्रेलियाला शेवटच्या ओव्हरमध्ये 10 धावांची गरज होती. तर मैदानात ग्लेन मॅक्सवेल आणि एडम झॅम्पा ही जोडी मैदानात होती. तर कर्णधार एडन मारक्रम याने लुंगी एन्गिडी याा शेवटची ओव्हर टाकायला दिली.
लुंगीने स्ट्राईकवर असलेल्या ग्लेन मॅक्सवेल याच्यासमोर हुशारीने बॉलिंग केली. मॅक्सवेलने पहिल्या बॉलवर 2 धावा केल्या. त्यानंतर मॅक्सवेलने दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकत विजयातील अंतर आणखी कमी केलं. लुंगीने त्यानंतर जोरदार कमबॅक केलं. लुंगीने तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर एकही धाव दिली नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी आता 2 बॉलमध्ये 4 रन्सची गरज होती.
मॅक्सवेलने पाचव्या चेंडूवर चौकार ठोकला आणि ऑस्ट्रेलियाला 1 चेंडूआधी आणि 2 विकेट्सने विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. ऑस्ट्रेलियाने 19.5 ओव्हरमध्ये हा सामना जिंकला. कांगारुंनी यासह ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. तर दक्षिण आफ्रिकेचं मालिका विजयाचं स्वप्न भंगलं.
ऑस्ट्रेलियासाठी ग्लेन मॅक्सवेल याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. मॅक्सवेलने 36 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 8 फोरसह नॉट आऊट 62 रन्स केल्या. तर कॅप्टन मिचेल मार्श याने 37 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 3 फोरसह 54 रन्स केल्या. या दोघांनी केलेल्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला विजय मिळवता आला. तर ट्रेव्हिस हेड आणि टीम डेव्हिड या दोघांनी योगदान दिलं.या व्यतिरिक्त इतरांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. मात्र मॅक्सवेलने अखेरपर्यंत नाबाद राहत ऑस्ट्रेलियाला विजयी केलं.
दक्षिण आफ्रिकेसाठी कॉर्बिन बॉश याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. तर कगिसो रबाडा आणि क्वेना मफाका या जोडीने प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर एडन मारक्रम याने 1 विकेट मिळवली. मात्र दक्षिण आफ्रिका विजय मिळवण्यात अपयशी ठरली.
त्याआधी कांगारुंनी टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. दक्षिण आफ्रिकेसाठी डेवाल्ड ब्रेव्हीस याने सर्वाधिक 53 धावा केल्या. तर इतरांनीही चांगली साथ दिली. मात्र त्यानंतरही दक्षिण आफ्रिकेला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 172 धावांपर्यंतच पोहचता आलं. दक्षिण आफ्रिकेकडून डेवाल्ड व्यतिरिक्त वॅन डर डुसेन याने 38, ट्रिस्टन स्टब्स याने 25 आणि लुहान डी प्रिटोरियस याने 24 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियासाठी नॅथन एलिस याने तिघांना बाद केलं. तर जोश हेझलवूड आणि एडम झॅम्पा या जोडीने 2-2 विकेट्स मिळवल्या.
ऑस्ट्रेलियाचा मालिका विजय
GLENN MAXWELL WINS IT ON THE SECOND LAST BALL!#AUSvSA pic.twitter.com/gvrzvyHnGc
— cricket.com.au (@cricketcomau) August 16, 2025
आता उभयसंघात 19 ते 24 ऑगस्ट दरम्यान 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे.