बांगलादेशने इतिहास रचला, ऑस्ट्रेलियाला लोळवलं, टी 20 मालिका 3-0 ने जिंकली!

| Updated on: Aug 07, 2021 | 11:11 AM

Australia vs Bangladesh बांगलादेश क्रिकेट संघाने (Bangladesh Cricket Team) टी 20 मध्ये इतिहास रचला आहे. बांगलादेशने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 3-0 ने हरवून 5 सामन्यांची मालिका जिंकली आहे. पहिले तिन्ही सामने जिंकून बांगलादेशने ऐतिहासिक विजयाची नोंद केली.

बांगलादेशने इतिहास रचला, ऑस्ट्रेलियाला लोळवलं, टी 20 मालिका 3-0 ने जिंकली!
australia vs bangladesh
Follow us on

Australia vs Bangladesh ढाका : बांगलादेश क्रिकेट संघाने (Bangladesh Cricket Team) टी 20 मध्ये इतिहास रचला आहे. बांगलादेशने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 3-0 ने हरवून 5 सामन्यांची मालिका जिंकली आहे. पहिले तिन्ही सामने जिंकून बांगलादेशने ऐतिहासिक विजयाची नोंद केली. काल शुक्रवारी झालेल्या तिसऱ्या सामन्यात बांगलादेशने ऑस्ट्रेलियाचा 10 धावांनी पराभव केला. महत्त्वाचं म्हणजे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी केवळ 128 धावांची गरज होती. मात्र इतक्या धावाही त्यांना करता आल्या नाहीत. ऑस्ट्रेलियाचा संघ चार बाद 117 धावापर्यंतच मजल मारु शकला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी, वन डे आणि टी 20 फॉरमॅटमध्ये बांगलादेशने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका विजय मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी झालेल्या दोन टी 20 सामन्यात बांगलादेशने अनुक्रमे 23 धावा आणि 5 विकेट्स राखून विजय मिळवला होता.

एलिसची हॅटट्रिक, बांगलादेशचे फलंदाज ढेपाळले

दरम्यान, या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार महमदुल्लाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र बांगलादेशच्या फलंदाजांना मोठी मजल मारता आली नाही. बांगलादेशला 127 धावांपर्यंतच आव्हान उभं करता आलं. बांगलादेशकडून एकट्या कर्णधार महमदुल्लाने सर्वाधिक 52 धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या करता आली नाही. त्यामुळे बांगलादेशला निर्धारित 20 षटकात 9 बाद 127 धावाच करता आल्या.

ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणाऱ्या नॅथन एलिसने हॅट्रिक घेऊन बांगलादेशला स्वस्तात गुंडाळण्यात मोठा वाटा उचलला. तीन चेंडूत तीन विकेट घेऊन, टी 20 पदार्पणात हॅटट्रिक करणारा एलिस हा पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याशिवाय अॅडम झाम्पा आणि जोश हेजलवूड यांनी दोन दोन विकेट्स घेतल्या.

बांगलादेशची टिच्चून गोलंदाजी

दरम्यान, बांगलादेशच्या 128 धावांचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांना तग धरता आला नाही. एकामागे एक फलंदाज बाद होत गेले. कर्णधार मॅथ्यू वेड केवळ 1 धाव करुन दुसऱ्याच षटकात बाद झाला. बेन मेक्डरमॉट (35) आणि मिचेल मार्श (51) यांनी 63 धावांची भागीदारी करुन विजयाच्या दिशेने कूच केली. मात्र दोघांनी धावांची योग्य गती न राखल्याने, दबाव वाढत गेला. मिचेल मार्शने मालिकेतील पहिलं अर्धशतक ठोकलं., मात्र त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. अर्धशतकानंतर लगेचच तो माघारी परतला.

महत्त्वाचं म्हणजे ऑस्ट्रेलियाला 3 ओव्हरमध्ये 34 धावांची गरज होती, त्यावेळी त्यांच्याकडे तब्बल 7 विकेट्स शिल्लक होत्या. मात्र तरीही त्यांना केवळ 24 धावाच करता आल्या. 19 व्या षटकात मुस्तफिजूर रहमानने जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने या षटकात केवळ 1 धाव दिली. त्यामुळे कांगारुंना 10 धावा अपुऱ्या पडल्या. बांगलादेशने सलग तीन सामने जिंकून मालिकाही खिशात टाकली.

संबंधित बातम्या 

BAN vs AUS : ऑस्ट्रेलियाला मिळाला नवा कर्णधार, टी 20 विश्वचषकापूर्वी मोठा निर्णय