
मुंबई | भारतात 2011 नंतर यंदा 2023 मध्ये 12 वर्षांनंतर आयसीसी वनडे वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात येणार आहे. ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी काहीही कमी पडू नये, यासाठी बीसीसीआय जोरदार तयारी करतेय. या दरम्यान आयसीसी आणि बीसीसीआयने पाकिस्तानला मोठा झटका दिला आहे. पाकिस्तानने वर्ल्ड कपमधील 2 सामन्यांचं ठिकाण बदलण्याची विनंती केली होती. आयसीसीने ही विनंती फेटाळून लावलीय. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआय आणि आयसीसीने मंगळवारी एका बैठकीनंतर हा निर्णय घेतला. पीसीबीला याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
रिपोर्टनुसार, पीसीबीने अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यांचं ठिकाण बदलण्याची विनंती केली होती. अफगाणिस्तान विरुद्धचा सामना हा चेन्नई आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना हा बंगळुरु खेळवण्यात येणार आहे. आयसीसी आणि बीसीसीआयने पीसीबीला मेसेजद्वारे सामन्याचं स्थळ बदलणार नसल्याचं कळवलंय. तसेच सामन्याचं ठिकाण बदलण्यासाठी ठोस कारण नसल्याचंही पीसीबीला सांगितलंय. आयसीसी स्पर्धेत सामन्याचं ठिकाण सुरक्षेच्या कारणास्तव बदलता येतं. मात्र पीसीबीने केलेल्या विनंतीत ठोस कारण सांगण्यात आलेलं नाही.
याआधी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत-पाक सामना हा धर्मशाळाऐवजी कोलकाता इथे खेळवण्यात आला होता. पाकिस्तानसाठी चेन्नई आणि बंगळुरु सर्वात सुरक्षित ठिकाण समजलं जातं. पीसीबीचे माजी अध्यक्ष नजीम सेठी यांनी टीम इंडिया विरुद्ध अहमदाबादमध्ये खेळण्याबाबत चिंता व्यक्त केली होती. मात्र त्याबाबतही विचार करण्यात आला नव्हता.
दरम्यान आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक अजूनही जाहीर करण्यात आलेलं नाही. पाकिस्तानने सामन्याचं ठिकाण बदलण्याची मागणी ही ड्राफ्ट शेड्यूलनुसार केली आहे. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक हे येत्या आठवड्यात जाहीर करण्यात येऊ शकतं.
दरम्यान टीम इंडिया वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधी आशिया कप आणि त्याआधी वेस्टइंडिज दौरा करणार आहे. या विंडिज दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर झालंय. मात्र अजूनही संघ जाहीर करण्यात आलेलं नाही. लवकरच भारतीय संघ जाहीर करण्यात येणार आहे. टीम इंडिया या विंडिज दौऱ्यात कसोटी, वनडे आणि टी 20 मालिका खेळणार आहे.