Shubman Gill : भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदी शुबमन गिल याची नियुक्ती, रोहितची जागा सांभाळणार

Team India test Captain : शुबमन गिल याला टेस्ट टीमचा कॅप्टन करण्यात आलं आहे. कर्णधारपदासाठी 3-4 खेळाडूंची नावं चर्चेत होती. मात्र गिलने सर्वांना मागे टाकत कर्णधारपदाचा काटेरी मुकूट मिळवला आहे.

Shubman Gill :  भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदी शुबमन गिल याची नियुक्ती, रोहितची जागा सांभाळणार
Shubman Gill Team India Test Captain
Image Credit source: Shubman Gill X Account
| Updated on: May 24, 2025 | 2:16 PM

भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदी युवा सलामीवीर शुबमन गिल याची नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआय निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली आहे. टीम इंडिया जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. मात्र त्याआधी कर्णधार रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रोहितनंतर भारतीय संघाचा कर्णधार कोण असणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात होता. अखेर आता या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला आहे.

बीसीसीआय निवड समितीची मुंबईतील मुख्यालयात बैठक पार पडली. त्यानंतर निवड समिती अध्यक्षांनी पत्रकार परिषद घेतली. आगरकर यांनी शुबमन गिल याचं कर्णधार म्हणून नाव जाहीर केलं. सोबतच इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणाही केली. इंग्लंड दौऱ्यासाठी 18 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. विकेटकीपर ऋषभ पंत याला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

अजित आगरकर काय म्हणाले?

“आम्ही कर्णधारपदासाठी नावांवर चर्चा केली आहे. तसेच टीममधील सदस्यांकडून मतं जाणून घेतली. नेतृत्व करणं अर्थातच दबावाचं काम आहे. गिल ती जबाबदारी पार पाडेल, अशी आशा आहे”, असा विश्वास आगरकर यांनी व्यक्त केला. कर्णधारपदासाठी शुबमनसह ऋषभ पंत, केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह या चौघांची नावं आघाडीवर होती. मात्र सुरुवातीपासूनच गिल प्रबळ दावेदार समजला जात होता. अखेर निवड समितीनेही गिलच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब केला आहे.

टीम इंडियाचा इंग्लंड दौरा

दरम्यान टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात यजमानांसह एकूण 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेचं आयोजन हे 20 जून ते 4 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. शुबमनची कर्णधार म्हणून ही पहिलीच मालिका असणार आहे. त्यामुळे गिल या मालिकेत कर्णधार आणि फलंदाज म्हणून दुहेरी भूमिका कशी पार पाडतो? हे या मालिकेतून स्पष्ट होईल.

शुबमन गिल याची कसोटी कारकीर्द

दरम्यान शुबमन गिल याने आतापर्यंत टीम इंडियाचं 32 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. गिलने या सामन्यांमध्ये 35.05 च्या सरासरीने 1 हजार 893 रन्स केल्या आहेत. गिलने या फॉर्मेटमध्ये 4 शतकं आणि 7 अर्धशतकं केली आहेत. गिलने 2020 साली बॉर्डर गावसकर ट्रॉफी टेस्ट सीरिजमधून पदार्पण केलं होतं. तेव्हापासून गिल टीम इंडियासाठी सातत्याने खेळत आहे.

शुबमन गिल भारताचा नवा कसोटी कर्णधार

इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया : शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू इश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंह आणि कुलदीप यादव.