
आयपीएल 2026 स्पर्धेसाठी मिनी लिलाव 16 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. यासाठी बीसीसीआयने जोरदार तयारी केली असून फ्रेंचायझी देखील खेळाडूंवर बोली लावण्यासाठी सज्ज आहेत. असं असताना बीसीसीआयने एका नियमात बदल केला आहे. त्यामुळे विदेशी खेळाडूंचे धाबे दणाणले आहेत. बीसीसीआयने मिनी लिलावत मोठी रक्कम घेणाऱ्या विदेशी खेळाडूंच्या खिशावर कात्री चालवली आहे. काही खेळाडू जाणीवपूर्वक मेगा लिलावात भाग घेत नसल्याचं दिसून आलं आहे. त्यानंतर होणाऱ्या मिनी लिलावात मात्र आवर्जून भाग घेतात. असं करण्याचं कारण इतकी वर्षे बीसीसीआयच्या लक्षात आलं नव्हतं. पण फ्रेंचायझींनी ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे विदेशी खेळाडूंचा डाव फसला आहे. मेगा लिलावात संघाची बांधणी करताना फ्रेंचायझी विदेशी खेळाडूंवर फार खर्च करत नाही. पण मिनी लिलावात हे चित्र उलटं असतं. संघाची कमकुवत बाजू भरण्यासाठी विदेशी खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लावतात. आता तसं केलं तरी फार काही पैसे मिळणार नाहीत.
बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार, मिनी ऑक्शनमध्ये विदेशी खेळाडूंना 18 कोटींच्या वर रक्कम मिळू शकत नाही. त्यांच्यावर 25 ते 30 कोटी बोली लागली तरी त्यांच्या हातात फक्त 18 कोटी येणार आहेत. उर्वरित पैसे बीसीसीआय लोकल खेळाडूंच्या उत्कर्षासाठी लावणार आहे. त्यामुळे विदेशी खेळाडू आता 18 कोटींच्या वर एक रुपयाही कमवू शकणार नाहीत. उदाहरण द्यायचं झालं तर , कॅमरून ग्रीन आणि लियाम लिव्हिंगस्टोन मिनी लिलावात उतरले आहेत. त्यांच्यासाठी फ्रेंचायझींनी 25 ते 30 कोटींची बोली लावली तरी त्यांच्या हाती फक्त 18 कोटी पडणार आहेत.
कोलकाता नाईट रायडर्सकडे 64.3 कोटी, चेन्नई सुपर किंग्सकडे 43.4 कोटी, सनरायझर्स हैदराबादच्या पर्समध्ये 25.5 कोटी, दिल्ली कॅपिटल्सकडे 21.18 कोटी, खनौ सुपर जायंट्सकडे 22.95 कोटी, राजस्थान रॉयल्सकडे 16.05 कोटी, आरसीबीकडे 16.4 कोटी, गुजरात टायटन्सकडे 12.9 कोटी, पंजाब किंग्सकडे 11.5 कोटी, मुंबई इंडियन्सकडे फक्त 2.75 कोटी शिल्लक आहेत. म्हणजेच मिनी लिलावात कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे सर्वाधिक बोली लावणार हे स्पष्ट आहेत. आता हे दोन्ही संघ कोणत्या खेळाडूंना प्राधान्य देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.