
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने काही रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत. त्यामुळे बीसीसीआयसोबत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांना एक संधी चालून आली आहे. मात्र यासाठी काही अटी आणि शर्थी आहे. या पदांसाठी पात्रता निश्चित करण्यात आली आहे. राष्ट्रीय निवड समितीच्या पदाव्यतिरिक्त, महिला आणि कनिष्ठ निवड समितीच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. बीसीसीआयने त्यांच्या वेबसाईटवर या पदांसाठी जाहीरात प्रसिद्ध केली आहे. वरिष्ठ पुरुष संघासाठी दोन राष्ट्रीय निवड समिती सदस्य, महिला संघासाठी चार निवड समिती सदस्या आणि कनिष्ठ संघासाठी एक निवड समिती सदस्य पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदावरील व्यक्तीला 90 लाखांचं वार्षिक वेतन असणार आहे. राष्ट्रीय निवडकर्त्याच्या पदासाठी 10 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
पुरुष संघासाठी राष्ट्रीय निवडकर्ते : दोन पदासाठी ही जागा भरली जाणार आहे. वरिष्ठ पुरुषांच्या कसोटी, वनडे-टी20 आंतरराष्ट्रीय संघाची निवड करण्यासाठी ही पदं भरली जातील. यासाठी किमान 7 कसोटी सामने आणि 30 प्रथम श्रेणी किंवा 10 वनडे आणि 20 प्रथम श्रेणी सामने खेळणं आवश्यक आहे. खेळाडू 5 वर्षांपूर्वी निवृत्त झालेला असावा. इतकंच काय तर बीसीसीआय क्रिकेट समितीचा सदस्य नसावा.
महिला संघासाठी राष्ट्रीय निवडकर्ते : या पदासाठी इच्छुक असलेल्यांना एकदिवसीय, कसोटी आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी महिला संघ निवडावा लागणार आहे. याव्यतिरिक्त ते प्रशिक्षक, सहाय्यक कर्मचारी आणि इतर बाबींसाठी जबाबदार असतील. या पदासाठी अर्ज करणारी व्यक्ती भारतीय महिला क्रिकेट संघाकडून खेळलेली असावी. 5 वर्षापूर्वी निवृत्त झालेली असावी. तसेच पाच वर्षे बीसीसीआय क्रिकेट समितीचा सदस्य नसावी.
ज्युनिअर पुरुष संघ (22 वर्षाखालील) निवडीसाठी एका सदस्याची निवड केली जाणार आहे. दौरे आणि स्पर्धांसाठी संघ निवडण्याची जबाबदारी त्याच्यावर असेल. त्याने किमाना 25 प्रथम श्रेणी सामने खेळलेले असावेत. पाच वर्षापूर्वी निवृत्त झालेला असावा. तसेच पाच वर्षे क्रिकेट समितीचा सदस्य नसावा. या अटी पूर्ण आणि निवड झाल्यानंतर तुम्हाला बीसीसीआयकडून मुलाखतीसाठी बोलावले जाईल. कोणत्याही पदासाठी बीसीसीआयच्या अटी आणि शर्तींचे पालन करणे आवश्यक आहे. वरिष्ठ संघ निवड समितीच्या सदस्यांना सुमारे 90 लाख रुपये वार्षिक वेतन दिले जाईल. तर ज्युनियर क्रिकेट समितीच्या सदस्यांना 30 लाख रुपये वार्षिक वेतन मिळते.