Team India : टीम इंडियाचा 10 दिवस जोरदार सराव, स्पर्धेसाठी अशी तयारी, पाहा व्हीडिओ

ICC Womens World Cup 2025 : वूमन्स टीम इंडिया मिशन वनडे वर्ल्ड कप 2025 साठी तयार आहे. भारताने वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. बीसीसीआयने भारताच्या या सराव शिबीराचा एक व्हीडिओ पोस्ट केला आहे.

Team India :  टीम इंडियाचा 10 दिवस जोरदार सराव, स्पर्धेसाठी अशी तयारी, पाहा व्हीडिओ
womens team india preparatory camp
Image Credit source: bcci women X Account
| Updated on: Aug 14, 2025 | 9:47 PM

भारतीय महिला क्रिकेट संघाने आगामी आणि बहुप्रतिक्षित वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेसाठी कंबर कसली आहे. भारताने या स्पर्धेच्या अनेक दिवसांआधीच जोरदार सराव केला. आयसीसीच्या या स्पर्धेआधी भारताच्या खेळाडूंनी 10 दिवसीय सराव शिबिरात जोरदार तयारी केली. या सराव शिबिराचं आयोजन हे बंगळुरुत बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये करण्यात आलं होतं. भारताच्या महिला ब्रिगेडने या सराव शिबीरात घाम गाळला. बीसीसीआयने महिला ब्रिगेडच्या सरावाचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

वूमन्स टीम इंडिया वनडे वर्ल्ड कप 2025 साठी सज्ज

भारतीय संघ वनडे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. या स्पर्धेला 30 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर महाअंतिम सामना हा नोव्हेंबरला होणार आहे. भारत आणि श्रीलंका या 2 देशांकडे या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान आहे. याच स्पर्धेसाठी महिला ब्रिगेडने सराव शिबीरात बॉलिंग, बॅटिंग आणि फिल्डिंगची प्रॅक्टीस केली. फिटनेस लेव्हलमध्ये आणखी सुधारणा करण्यासह खेळाडूंना प्रत्येक आव्हानासाठी तयार ठेवण्याच्या उद्दिष्टाने या सराव शिबीराचं आयोजन करण्यात आल्याचं बीसीसीआयने म्हटलं आहे.

वूमन्स वर्ल्ड कप 2025 थोडक्यात

आयसीसी वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत एकूण 8 संघामध्ये चुरस असणार आहे. या 8 संघांमध्ये टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश आहे. या 8 संघांमध्ये 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान एकूण 31 एकदिवसीय सामने खेळवण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक संघाला या स्पर्धेत 7 सामने खेळायचे आहेत.

भारताचे सामने कुठे?

भारतीय संघाचे या स्पर्धेतील सामने हे बंगळुरु, कोलंबो, विशाखापट्टणम, इंदूर आणि गुवाहाटी येथे आयोजित करण्यात आले आहेत. हरमनप्रीत सिंह या स्पर्धेत भारताचं नेतृत्व करणार आहे. तर सांगलीकर स्मृती मंधाना भारतीय संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे.

मुंबईत या स्पर्धेच्या निमित्ताने काही दिवसांपूर्वी विशेष परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात वर्ल्ड कप ट्रॉफीचं अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमाला आयसीसी अध्यक्ष जय शाह, बीसीसीआय पदाधिकारी, भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राज, माजी ऑलराउंडर युवराज सिंह, कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना आणि जेमिमाह रॉड्रिग्स उपस्थित होते.

महिला ब्रिगेडचा जोरदार सराव

“आम्हाला साऱ्या देशवासियांची गेल्या अनेक वर्षांची वर्ल्ड कप जिंकण्याची प्रतिक्षा संपवायची आहे. मी जेव्हा युवराज भय्याला पाहते तेव्हा प्रेरणा मिळते”, असं हरमनप्रीतने या परिसंवादात म्हटलं होतं.