RCB वर बीसीसीआय करणार कठोर कारवाई? या तारखेला होणार निर्णय, महत्वाची अपडेट समोर

बेंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये ४ जून रोजी आरसीबीच्या विजयोत्सवा दरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली. त्यात ११ जणांचा मृत्यू झाला. बीसीसीआयने या घटनेला गांभीर्याने घेऊन आगामी बैठकीच्या अजेंड्यात हा विषय समाविष्ट केला आहे.

RCB वर बीसीसीआय करणार कठोर कारवाई? या तारखेला होणार निर्णय, महत्वाची अपडेट समोर
| Updated on: Jun 12, 2025 | 7:39 AM

आयपीएल २०२५ अनेक अर्थांनी चर्चेत आली. या आयपीएलचे विजेतेपद आरसीबीच्या संघाला मिळाले. या विजयानंतर त्यांच्या जल्लोष साजरा करणाऱ्या आरसीबीसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित झाले. बेंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये विजयोत्सवा दरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत ११ जणांना आपला जीव गमवावा लागला आणि ५६ जण जखमी झाले. ४ जून रोजी चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सुमारे अडीच लाख चाहते त्यांच्या आवडत्या क्रिकेट स्टार्सना पाहण्यासाठी आले होते. त्यावेळी गोंधळ उडाला होता. या गर्दीने चेंगराचेंगरीचे रूप धारण केले, ज्यामुळे हा दुर्दैवी अपघात झाला. यामुळे आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) गंभीर पावले उचलण्यास सुरुरवात केली आहे. या पद्धतीच्या घटना पुन्हा घडू नये म्हणून बीसीसीआय मोठे निर्णय घेणार आहेत.

बेंगळुरुमधील घटनेनंतर बीसीसीआयच्या २८ व्या अ‍ॅपेक्स कौन्सिलची बैठक होणार आहे. या बैठकीत इंडियन प्रीमियर लीगमधील विजयाच्या उत्सवासाठी मानक मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यावर चर्चा करणार आहे. ही बैठक शनिवारी १४ जून रोजी होणार आहे. त्यात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा होणार आहे.

बीसीसीआयने आरसीबीच्या कार्यक्रमासंदर्भात मान्य केले आहे की, या कार्यक्रमाचे नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करता आले असते. यामुळे बीसीसीआयने या घटनेला गांभीर्याने घेऊन आगामी बैठकीच्या अजेंड्यात हा विषय समाविष्ट केला आहे. बीसीसीआयच्या सूत्राने पीटीआयला सांगितले की, शनिवारी होणाऱ्या बैठकीत, आयपीएलमध्ये विजयोत्सव साजरा करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात येतील. त्यावर सखोल चर्चा होणार आहे. बेंगळुरु प्रमाणे घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस पावले उचलली जातील. क्रिकेटच्या चाहत्यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी सर्वच पावले उचलण्यात येतील. आरसीबीवर कारवाईसंदर्भातही बैठकीत चर्चा होणार आहे.

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान होणाऱ्या क्रिकेट मालिकेतील स्थळ निश्चित करण्यासंदर्भातही बीसीसीआयच्या बैठकीत निर्णय होणार आहे. त्यासाठी मैदानांची निवड करण्यात येणार आहे. तसेच वयाची तपासणी करण्याच्या प्रक्रियेचा आढावा घेण्यात येणार आहे. कारण अंडर १६ आणि अंडर १५ क्रिकेटमधील मुलांकडून वयाच्या फसवणुकीचे काही प्रकार समोर आले होते.