पाकिस्तानच्या हेड कोचला कचरा उचलण्यास पाडलं भाग, खेळाडूंमुळे ओढावली अशी स्थिती

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने, तर दुसरा सामना पाकिस्तानने जिंकला आहे. त्यामुळे 24 ऑक्टोबरला रावलपिंडीत होणारा सामना निर्णायक ठरणार आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा हेड कोच जेसन गिलेस्पीला कचरा उचलणं भाग पडलं.

पाकिस्तानच्या हेड कोचला कचरा उचलण्यास पाडलं भाग, खेळाडूंमुळे  ओढावली अशी स्थिती
Image Credit source: (PC-Stu Forster/Getty Images)
| Updated on: Oct 22, 2024 | 10:40 PM

पाकिस्तानची गेल्या काही वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये नाचक्की झाली होती. देशात खेळताना एक सामना जिंकण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागला. इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर पुन्हा तो कित्ता गिरवणार असं वाटत होतं. पण पाकिस्तानने दुसऱ्या कसोटी सामन्यात दिग्गज खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला. तसेच दुसरा कसोटी सामनाही जिंकला. यामुळे मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. तिसरा कसोटी सामना मालिका विजयासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही संघ यासाठी प्रयत्नशील असतील यात शंका नाही. दुसरा कसोटी सामना 24 ऑक्टोबरला रावलपिंडीत होणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघ कसून सराव करत आहे. असं असताना या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा हेड जेसन गिलेस्पी याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत गिलेस्पी कचरा उचलताना दिसत आहे. रावलपिंडी मैदानात प्लास्टिक बाटल्या पडल्या होत्या. पाकिस्तानी खेळाडूंनी सराव करताना या बाटल्यांचा वापर केला होता. पाणी आणि एनर्जी ड्रिंक प्यायल्यानंतर बाटल्यांचा कचरा असाच मैदानात सोडला. हे कृत्य जेसन गिलेस्पीला काही आवडलं नाही त्याने मैदानातील सर्व बाटल्या एकत्र केल्या आणि कचऱ्याच्या डब्यात टाकल्या.

गिलेस्पीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पाकिस्तानी चाहते खेळाडूंना ट्रोल करत आहे. पाकिस्तानी क्रीडारसिकांनी आपल्याच खेळाडूंची शाळा घेतली. सामना जिंकण्यापूर्वी शिस्त शिकणं गरजेचं असा टोला लगावला आहे. दुसरीकडे, पाकिस्तानचा हेड कोच जेसन गिलेस्पी यांचं कौतुक केल जात आहे. इतकी मोठी व्यक्ती असूनही मैदानातील कचरा साफ करू शकते, याचं आश्चर्य वाटलं. त्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंनी यातून धडा घेतला पाहीजे असं नेटकरी सांगत आहेत.

पाकिस्तानने जेसन गिलेस्पीच्या खांद्यावर एप्रिल 2024 मध्ये संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली होती. त्याच्या प्रशिक्षणाखाली पाकिस्तानने बांगलादेशविरुद्ध पहिली मालिका खेळली होती. या मालिकेत पाकिस्तान चीतपट झाला होता. बांग्लादेश सारख्या दुबळ्या संघाने पाकिस्तानला त्यांच्यात भूमीत लोळवलं होतं. तर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 47 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बाबर, शाहीन आणि नसीमला बाहेरचा रस्ता दाखवला होता.