
देशांतर्गत क्रिकेटमध्ये नावलौकिक मिळवलेल्या शेल्डन जॅक्सन याने काही दिवसांपूर्वी वनडे आणि टी20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आता त्याने क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून संन्यास घेतल्याचं जाहीर केलं आहे. देशांतर्गत रणजी क्रिकेट स्पर्धेत सौराष्ट्रसाठी 8 फेब्रुवारीला शेवटचा सामना खेळला. हा सामना सौराष्ट्र आणि गुजरात यांच्यात पार पडला. हा सामना गुजरातने जिंकला आणि उपांत्य फेरी गाठली आहे. शेल्डन जॅक्सनने आपल्या क्रिकेट कारकिर्दित 31 शतक ठोकली आहेत. पण त्याला हवा तसा निरोप मिळाला नाही. सौराष्ट्रसाठी खेळताना शेवटच्या सामन्यात काही खास करू शकला नाही. इतकंच काय तर त्याची टीमही फेल गेली. 38 वर्षीय जॅक्सनने 2006 मध्ये सौराष्ट्रसाठी डेब्यू केलं होतं. यानंतर सौराष्ट्रसाठी 2009 मध्ये टी20 आणि 2011 मध्ये प्रथम श्रेणीत पदार्पण केलं होतं.. जवळपास 19 वर्षे शेल्डन सौराष्ट्रसाठी खेळला. त्यामुळे टीम एका अनुभवी फलंदाजाला मुकणार आहे. टीम इंडियासाठी खेळण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं.
रणजी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत गुजरातने सौराष्ट्रवर एक डाव आणि 98 धावांनी विजय मिळला. प्रथम फलंदाजी करताना सौराष्ट्रने 216 धावा केल्या. या डावात शेल्डनने 14 धावा केल्या आणि सिद्धार्थ देसाईच्या गोलंदाजीवर पायचीत होत तंबूत गेला. पण गुजरातने पहिल्या डावात 511 धावा करत 295 धावांची मजबूत आघाडी घेतली. आघाडी मोडू काढण्याच्या नादात सौराष्ट्रचा दुसरा डाव 197 धावांवर आटोपला. यात शेल्डन जॅक्सनने 32 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 27 धावा केल्या.
After the match, Sheldon Jackson and his teammates gather for a photo. He has played his last game for Saurashtra. @sportstarweb pic.twitter.com/mUGFOmmTVx
— Vivek Krishnan (@vivek9301) February 11, 2025
शेल्डन जॅक्सनने 105 प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात 46.12 च्या सरासरीने 7242 धावा केल्या. यावेळी त्याने 31 शतकं आणि 39 अर्धशतकं ठोकली आहेत. 86 लिस्ट ए सामन्यात 36.25 च्या सरासरीने 2792 धावा केल्या. यात त्याने 9 शतकं आणि 14 अर्धशतकं ठोकली. तसेच 84 टी20 सामन्यात 27.45 च्या सरासरीने 1812 धावा केल्या. यात त्याने 1 शतक आणि 11 अर्धशतकं ठोकली. आयपीएलमध्ये त्याला फक्त 9 सामने खेळण्याची संधी मिळाली. त्याने 10.16 च्या सरासरीने 61 धावा केल्या. आयपीएलमध्ये शेवटचा सामना 2022 मध्ये खेळला होता.