CSK Vs GT IPL 2023 Final | चेन्नई विरुद्ध गुजरात आमनेसामने, महामुकाबल्यात कोण मारणार बाजी?

| Updated on: May 28, 2023 | 1:00 AM

आयपीएल 16 व्या हंगामातील अंतिम सामन्यात गुजरात टायटन्ससमोर चेन्नई सुपर किंग्स या अनुभवी संघांचं तगडं आव्हान आहे. महाअंतिम सामन्यात कोण मारणार बाजी?

CSK Vs GT IPL 2023 Final | चेन्नई विरुद्ध गुजरात आमनेसामने, महामुकाबल्यात कोण मारणार बाजी?
Follow us on

अहमदाबाद | आयपीएल 16 हंगामात रविवारी 29 मे ला महाअंतिम सामना होणार आहे. या फायनल सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात ट्रॉफीसाठी लढत होणार आहे.  चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व हे महेंद्रसिंह धोनी याच्याकडे आहे. तर हार्दिक पंड्या याच्याकडे गुजरात टायटन्सची टीमची जबाबदारी आहे.  तुलनेने पाहिल्यास चेन्नई गुजरातवर कित्येक पटीने वरचढ आहे.  चेन्नईची ही अंतिम फेरीत पोहचण्याची दहावी वेळ आहे. तर गुजरातने सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक दिलीय.  या दोन्ही संघांमधील काही निवडक खेळाडूंनी मोसमाच्या सुरुवातीपासून सातत्यपूर्ण धडाकेबाज कामगिरी केली आहे.

गुजरातकडून शुबमन गिल याने या हंगामात सर्वाधिक धावा केल्या आहेत. शुबमन हा ऑरेन्ज कॅप होल्डर आहे. त्याने आरसीबी कॅप्टन फाफ डु प्लेसीस याला मागे टाकत ही कॅप मिळवलीय. शुबमनने या हंगामात 3 शतकांसह 800 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला मोहम्मद शमी आणि राशिद खान ही जोडी धमाका करतेय.  मोहम्मद  शमी पर्पल कॅप होल्डर आहे.  तर राशिद सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.

तर चेन्नईकडून डेव्हॉन कॉनव्हे, ऋतुराज गायकवाड, तुषार देशपांडे ही तिकडीही त्याच जोमाने कामगिरी करतेय.  त्यामुळे महाअंतिम मुकाबल्यात सामना हा अटीतटीचा असेल, याबाबत नक्कीच शंका नाही.  या दोन्ही संघात आतापर्यंतचे आकडे कसे राहिलेत, हे एकदा आपण पाहुयात.

आकडे काय सांगतात?

या 16 व्या मोसमात दोन्ही संघ एकूण 2 वेळा आमनेसामने आले आहेत. यात एक साखळी फेरीतील सामना होता. तर प्लेऑफ क्वालिफायर 1 या सामन्यात दोन्ही संघ एकमेकांसमोर होते. या सामन्यात चेन्नईने गुजरातला पाणी पाजलं होतं. तर त्याआधी गेल्या हंगामातही दोन्ही टीम 2 वेळा भिडल्या होत्या. अशा प्रकारे या दोन्ही संघांमध्ये एकूण 4 वेळा आमनासामना झाला आहे. आकड्यांनुसार गुजरात चेन्नईवर वरचढ आहे. गुजरातने चेन्नईवर 4 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. तर चेन्नईने गुजरातवर आयपीएल 2023 क्वालिफायर 1 मध्ये एकमेव विजय मिळवला.

त्यामुळे आकड्यांच्या हिशोबाने गुजरात टीम वरचढ असल्याचं स्पष्ट होतं. मात्र अंतिम सामन्यात काहीही उलटफेर होऊ शकतो. त्यामुळे आकड्यांवरुन कोणत्याही टीमला गृहीत धरणं चुकीच ठरेल. यामुळे आता अंतिम सामन्यात चेन्नई पाचव्यांदा ट्रॉफी जिंकणार की गुजरात सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी उंचावरणार हे लवकरच स्पष्ट होईल .

गुजरात टायटन्स टीम | हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुबमन गिल, विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा, जयंत यादव, जोशुआ लिटल, शिवम मावी, रविश्रीनिवासन साई किशोर, श्रीकर भारत, साई सुदर्शन, अल्झारी जोसेफ, प्रदीप सांगवान, मॅथ्यू वेड, दासून शनाका, ओडियन स्मिथ, दर्शन नळकांडे, उर्विल पटेल आणि यश दयाल.

चेन्नई सुपर किंग्स टीम | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, सुभ्रांशु सेनापति, मोईन अली, शिवम दूबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, रविंद्र जडेजा, कायले जेमिन्सन, निशांत सिंधू, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मतीशा पाथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चाहर , प्रशांत सोलंकी, महेश थीक्ष्णा, शेख रशीद, भगत वर्मा आणि अजय मंडल.