Cricket : टी 20i मालिकेसाठी नव्या कर्णधाराची घोषणा, कुणाला संधी?

T20i Tri Series 2025 : पाकिस्तानमध्ये होणाऱ्या टी 20i ट्राय सीरिजआधी श्रीलंका क्रिकेट टीमच्या 2 खेळाडूंनी मोठा निर्णय घेतला आहे. या 2 खेळाडूंनी पाकिस्तान सोडलं आहे.

Cricket : टी 20i मालिकेसाठी नव्या कर्णधाराची घोषणा, कुणाला संधी?
Pakistan vs Sri Lanka
Image Credit source: Surjeet Yadav/MB Media/Getty Images
| Updated on: Nov 18, 2025 | 12:21 AM

यजमान पाकिस्तान क्रिकेट टीमने श्रीलंकेला 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 3-0 अशा फरकाने क्लिन स्वीप केलं. त्यानंतर आता पाकिस्तान, श्रीलंका आणि झिंबाब्वे यांच्यात टी 20i ट्राय सीरिज खेळवण्यात येणार आहे. या मालिकेला मंगळवार 18 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. मात्र मालिकेला काही तास शिल्लक असताना श्रीलंका क्रिकेट टीमला मोठा झटका लागला आहे. या टी 20i ट्राय सीरिजआधी श्रीलंकेच्या 2 खेळाडूंनी तडकाफडकी पाकिस्तान सोडलं आहे. या खेळाडूंनी असा निर्णय का घेतला? हे सविस्तर जाणून घेऊयात.

पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान इस्लामाबादमध्ये स्फोट झाला. त्यामुळे श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये भीतीचं वातावरण होतं. त्यामुळे श्रीलंकेच्या खेळाडूंनी सुरक्षेच्या कारणामुळे तात्काळ पाकिस्तान सोडण्याचा निर्णय केला होता. मात्र पीसीबी अर्थात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने श्रीलंकेच्या खेळाडूंना सुरक्षेची हमी दिली. त्यानंतर खेळाडूंनी थांबण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर आता ट्राय सीरिजच्या तोंडावर 2 खेळाडू मायदेशी परतले आहेत.

श्रीलंकेचे 2 खेळाडू मायदेशी

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज असिथ फर्नांडो आणि कॅप्टन चरित असलंका या दोघांनी पाकिस्तान सोडलं आहे. असिथ आणि चरित या दोघांनी वैद्यकीय कारणामुळे पाकिस्तान सोडलं आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने याबाबतची माहिती दिली आहे. या दोन्ही खेळाडूंची तब्येत बरी नसल्याने त्यांना मायदेशी बोलवण्यात आल्याचं क्रिकेट बोर्डाने सांगितलंय.

आता कॅप्टन कोण?

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने चरित असलंका याच्या जागी दासुन शनाका याला ट्राय सीरिजसाठी नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे. तर असिथ फर्नांडो याच्या जागी वेगवान गोलंदाज पवन रत्नायके याचा समावेश केला आहे.

ट्राय सीरिजबाबत थोडक्यात

दरम्यान ट्राय सीरिजमध्ये एकूण 3 संघांमध्ये 18 ते 19 नोव्हेंबर दरम्यान एकूण 7 टी 20i क्रिकेट सामने होणार आहेत. प्रत्येक संघाला 4 सामने खेळण्याची संधी मिळणार आहे.

ट्राय सीरिजचं वेळापत्रक

पहिला सामना, 18 नोव्हेंबर, पाकिस्तान विरुद्ध झिंबाब्वे

दुसरा सामना, 20 नोव्हेंबर, श्रीलंका विरुद्ध झिंबाब्वे

तिसरा सामना, 22 नोव्हेंबर, पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका

चौथा सामना, 23 नोव्हेंबर, पाकिस्तान विरुद्ध झिंबाब्वे

पाचवा सामना, 25 नोव्हेंबर, श्रीलंका विरुद्ध झिंबाब्वे

सहावा सामना, 27 नोव्हेंबर, पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका

अंतिम सामना, 29 नोव्हेंबर

मालिकेतील सर्व सामने रावळपिंडी क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहेत.

पाकिस्तान आणि झिंबाब्वे विरूद्धच्या टी 20i ट्राय सीरिजसाठी श्रीलंकेचा सुधारित संघ : दासुन शनाका (कॅप्टन) पथुम निसांका, कुसल मेंडिस, कुसल परेरा, कामिल मिशारा, कामिंडु मेंडिस, भानुका राजपक्षे, जेनिथ लियानगे, वानिंदु हसरंगा, महीश तीक्षाना, दुशान हेमंथा, दुष्मंथा चमीरा, नुवान तुषारा, ईशान मलिंगा आणि पवन रतनायके.