Mumbai Indians Captain: रोहित शर्माची पुन्हा थाटात एन्ट्री? मुंबईच्या चाहत्यांना मिळू शकते खूशखबर; मैदान गाजवणाऱ्या खेळाडूनं लॉजिक सांगितलं!
Mumbai Indians Captaincy: मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावर दिनेश कार्तिकने मोठं विधान केले आहे. त्याने रोहित शर्माला पाठिंबा दिला आहे.

मुंबई इंडियन्सने नुकतेच कायरन पोलार्डची नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. यानंतर आता नवीन कर्णधाराबद्दल चर्चा सुरू झाली आहे. जरी हार्दिक पांड्याने अद्याप संघ सोडलेला नसला तरी आयपीएल २०२७ मध्ये त्याला दुसऱ्या फ्रँचायझीमध्ये पाठवले जाऊ शकते, असे मानले जात आहे. रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून मुंबई इंडियन्सने मोठ्या अपेक्षांसह त्याची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. मात्र आता पुन्हा फेरबदलाचे संकेत दिसून येत आहे. रोहित पुन्हा कर्णधारपदाची सूत्रे हाती घेऊ शकतो का? यावर दिनेश कार्तिकने मोठं वक्तव्य केले आहे. ते आता चांगलेच चर्चेत आले आहे.
मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पाच आयपीएल विजेतेपदे जिंकली आहेत. २०२४ च्या हंगामासाठी रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्या कर्णधार झाला. कर्णधार म्हणून त्याने गुजरात टायटन्सला त्यांच्या पहिल्याच हंगामात विजय मिळवून दिला होता. दुसऱ्या वर्षी संघाला अंतिम फेरीत पोहोचवले. मात्र त्यानंतर पांड्याचे कर्णधारपद मुंबई इंडियन्ससाठी यशस्वी ठरले नाही. तीनपैकी दोन हंगामांमध्ये (२०२४ आणि २०२६) संघ प्लेऑफसाठी पात्रही ठरू शकला नाही. यानंतर अनेक टीका करण्यात आल्या.
यावर बोलताना दिनेश कार्तिक म्हणाला की, मला वाटतं की मुंबई इंडियन्स नवीन कर्णधाराच्या शोधात आहे. त्यांनी योग्य वेळी घोषणा करायला हवी. रोहित शर्मा का नाही? तो सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याने ही जबाबदारी स्वीकारल्यास काहीच हरकत नाही. जर तो उपलब्ध असेल, तर त्याचा वापर का करू नये? त्याच्यात क्षमता आहे. तो एक चांगला खेळाडू आहे. खेळाडू त्याच्याकडे आकर्षित होतात, असं कार्तिकने सांगितलं आहे. कार्तिकच्या मते रोहित हा सर्वोत्तम पर्याय आहे.
मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार होण्याच्या शर्यतीत तिलक वर्मा याचेही नाव असून त्याला आघाडीचा उमेदवार मानले जात आहे. हार्दिक पांड्या कर्णधार झाल्यानंतर केवळ त्याच्या कामगिरीबद्दलच नव्हे, तर ड्रेसिंग रूममधील वातावरणाबद्दलही चर्चा झाली. हार्दिक पांड्यासोबत चांगले संबंध असलेल्या कायरन पोलार्ड याची नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
