
मुंबई | क्रिकेट टीम इंडियाला 2013 पासून ते आतापर्यंत एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या आयोजनाचा मान भारताला मिळाला आहे. भारताला 2011 नंतर पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेचं यजमानपद मिळालंय. याआधी वनडे वर्ल्ड कपआधी टीम इंडियाला आशिया कप आणि विंडिज दौरा करायचाय. याआधी थेट कॅप्टन बदलण्याचा निर्णय घेतल्याने क्रिकेट चाहत्यांना झटका लागला आहे.
अवघ्या 5 दिवसांनी दुलीप ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होणार आहे.या स्पर्धेआधी टीमने कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतलाय. अनुभवी बॅट्समन मनदीप सिंह याला दुखापत झालीय. मनदीपला या दुखापतीमुळे दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळता येणार नाही. त्यामुळे मनदीपच्या जागी स्टार ऑलराउंडर जयंत यादव याला लॉटरी लागली आहे. जंयतकडे नॉर्थ झोन संघांच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अनिरुद्ध चौधरी यांनी याबाबतची माहिती दिली. चौधरी हे विभागीय निवड समितीचे समन्वयक आहेत.
दरम्यान मनदीप सिंह याच्या जागी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या नेहल वढेरा याला संधी देण्यात आली आहे. थोडक्यात काय तर मनदीप याच्या दुखापतीमुळे जंयतला कॅप्टन्सीची आणि नेहलला खेळण्याची संधी मिळालीय.
जयंत यादव याने टीम इंडियाचं कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केलंय. मात्र जयंतला सातत्याने टीम इंडियात संधी मिळालेली नाही. जंयतने टीम इंडियासाठी 6 कसोटी आणि फक्त 2 एकदिवसीय सामने खेळला आहे.
दुलीप ट्रॉफी 2023 स्पर्धेला येत्या 28 जूनपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 6 संघ दुलीप ट्रॉफीसाठी भिडणार आहेत. तर या स्पर्धेतील अंतिम सामना हा 12-16 जुलै दरम्यान पार पडणार आहे.
दुलीप ट्रॉफी स्पर्धेत वेस्ट झोन, साऊथ झोन, इस्ट झोन, नॉर्थ झोन, सेंट्रल झोन आणि नॉर्थ इस्टर झोन या 6 संघांमध्ये दुलीप ट्रॉफी जिंकण्यासाठी कडवी टक्कर पाहायला मिळणार आहे.