
यजमान इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजवर 1 डाव आणि 114 धावांनी विजय मिळवला. इंग्लंडने या विजयासह 3 सामन्यांच्या मालकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पदार्पणवीर गस ऍटकिन्सन हा इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला. गसने दोन्ही डावात मिळून एकूण 12 विकेट्स घेतल्या. इंग्लंडने यासह दिग्गज गोलंदाज 41 वर्षीय जेम्स अँडरसन याला विजयी निरोप दिला. जेम्सने विंडिज विरुद्धचा पहिला कसोटी सामन्यानंतर निवृ्त्त होणार असल्याचं आधीच जाहीर केलं होतं. इंग्लंडच्या विजयानंतर जेम्सला भावूक झालेला दिसून आला. त्यानंतर सहकाऱ्यांनी जेम्सला सावरलं. जेम्सचा भावूक झाल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
जेम्स अँडरसन आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीतील अखेरचा सामना संपल्यानंतर भावूक झाला. अँडरसनने आपल्या कसोटी कारकीर्दीतील 188 सामन्यांमध्ये 26.45 च्या सरासरीने 704 विकेट्स घेतल्या. अँडरसनने टेस्ट क्रिकेटमध्ये एकूण 32 वेळा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. तसेच अँडरसनने 32 वेळा 4 विकेट्सही घेतल्या.
जेम्स अँडरसन याने 2003 साली झिंबाब्वे विरुद्ध कसोटी पदार्पण केलं. हा सामना लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात आला होता. तर जेम्सने अखेरचा सामना ही इथेच खेळला. जेम्सने अशाप्रकारे जिथून कसोटी क्रिकेटची सुरुवात केली तिथेच त्याने शेवट केला. जेम्सने आपल्या क्रिकेट कारकीर्दीतील 21 वर्षांमध्ये एकूण 991 विकेट्स घेतल्या. तसेच जेम्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाजही ठरला आहे.
TEARS AT LORD’S..!!!!!!
– Farewell, James Anderson. 🐐 pic.twitter.com/XWx0DWLWFf
— Johns. (@CricCrazyJohns) July 12, 2024
दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम हा मुथैय्या मुरलीथरन याच्या नावावर आहे. मुरलीथरन याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 1 हजार 347 विकेट्स आहेत.
मुथैय्या मुरलीथरन : 1347
शेन वॉर्न :1001
जेम्स अँडरसन : 991
अनिल कुंबळे : 956
ग्लेन मॅग्राथ 949
वसीम अक्रम : 916
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन: बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, शोएब बशीर आणि जेम्स अँडरसन.
वेस्ट इंडिज प्लेइंग ईलेव्हन: क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), मिकील लुईस, कर्क मॅकेन्झी, अलिक अथनाझे, कावेम हॉज, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, गुडाकेश मोटी, अल्झारी जोसेफ, शामर जोसेफ आणि जेडेन सील्स.