आयपीएलमध्ये खेळताना या गोलंदाजाचा सामना करणे कठीण! ख्रिस गेलच्या खुलाशाने उडाली खळबळ

आयपीएल स्पर्धेत ख्रिस गेलने एक काळ गाजवला आहे. ख्रिस गेल समोर असला की गोलंदाजांना नकोसं व्हायचं. ख्रिस गेलने 2013 मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध 175 धावा केल्या होत्या. पण याच ख्रिस गेलला आयपीएलमध्ये एका गोलंदाजाची भीती वाटायची.

आयपीएलमध्ये खेळताना या गोलंदाजाचा सामना करणे कठीण! ख्रिस गेलच्या खुलाशाने उडाली खळबळ
| Updated on: Apr 08, 2025 | 3:54 PM

ख्रिस गेलचा आक्रमक खेळी पाहून एक काळ असा होता की भल्याभल्या गोलंदाजांना घाम फुटायचा. कारण त्याच्या रडारमध्ये चेंडू आला की थेट सीमेपार पोहोचवण्याची ताकद होती. त्यामुळे त्याला युनिवर्स बॉस म्हणून नाव पडलं होतं. पण या युनिवर्स बॉस असलेल्या ख्रिस गेलला आयपीएलमध्ये एका गोलंदाजाची भीती वाटायची. ख्रिस गेलने इनसाइड स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, आयपीएलमध्ये फलंदाजी करताना एका गोलंदाजाचा सामना करणं खूपच कठीण जायचं. गेलने घातक गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराहचं नाव घेतलं. नुकतंच दुखापतीतून बरा होऊन जसप्रीत बुमराह मैदानात उतरला आहे. आरसीबी विरूद्धच्या सामन्यात विकेट मिळाली नाही. पण 4 षटकात फक्त 29 धावा देत इकोनॉमी चांगली ठेवली आह. जसप्रीत बुमराहने आतापर्यंत खेळलेल्या 134 आयपीएल सामन्यात 165 विकेट घेतल्या आहेत. बुमराहची आयपीएलमध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही सर्वात घातक गोलंदाज म्हणून गणना होते. दुसरीकडे, आयपीएलमधील बेस्ट फलंदाज म्हणून गेलने विराट कोहलीला पसंती दिली आहे.

आयपीएल स्पर्धेत एकूण 142 सामने खेळत ख्रिस गेलने 4965 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये 6 शतकं आणि 31 अर्धशतकं ठोकली आहेत. आयपीएलमध्ये सर्वात मोठी खेळी खेळण्याचा मानही ख्रिस गेलला मिळाला आहे. गेलने 2013 मध्ये पुणे वॉरियर्स इंडिया विरुद्ध 175 धावा केल्या आहेत. हा या स्पर्धेतील सर्वात मोठा स्कोअर आहे. हा विक्रम अद्याप कोणीही मोडू शकलेलं नाही. आयपीएलमध्ये सर्वात वेगाने शतक करण्याचा विक्रमही गेलच्या नावावर आहे. गेलचा हा विक्रम मोडणे खूप कठीण आहे. एप्रिल 2013 मध्ये त्याने फक्त 30 चेंडूत शतक ठोकले.

ख्रिस गेलच्या नावावर टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रमही आहे. त्याने टी20 क्रिकेटमध्ये 14562 धावा केल्या आहेत. ख्रिस गेलने आतापर्यंत 463 टी20 सामने खेळले आहेत. यात गेलच्या नावावर टी20 क्रिकेटमध्ये 22 शतकं आणि 88 अर्धशतकांचा समावेश आहे. टी20 क्रिकेटमध्ये गेलचा स्ट्राईक रेट हा 144.75 चा आहे.