Dilip Doshi : भारताचे माजी दिग्गज स्पिनर दिलीप दोशी यांचं निधन, क्रिकेट विश्वावर शोककळा

Dilip Doshi Died In London : टीम इंडियाने माजी आणि दिग्गज फिरकीपटू दिलीप दोशी यांचं हृदयविकाराच्या झटकाने निधन झालंय. दोशी यांनी वयाच्या 77 वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Dilip Doshi : भारताचे माजी दिग्गज स्पिनर दिलीप दोशी यांचं निधन, क्रिकेट विश्वावर शोककळा
Former India Spinner Dilip Doshi
Image Credit source: Bcci x Account
| Updated on: Jun 24, 2025 | 12:36 AM

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामनादरम्यान क्रिकेट वर्तुळातून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. भारताचे माजी स्पिनर दिलीप दोशी यांचं निधन झालं आहे. दिलीप दोशी यांचं हृदयविकाराच्या झटक्याने लंडनमध्ये निधन झालंय. दिलीप दोशी यांनी 23 जून रोजी अखेरचा श्वास घेतला.  ते 77 वर्षांचे होते. पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त दिलं आहे. दिलीप दोशी यांच्या निधनाने क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. दिलीप दोशी यांनी वयाच्या 32 व्या वर्षी कसोटी पदार्पण केलं. दोशींनी अवघ्या 4 वर्षांमध्ये विकेट्सचं शतक पूर्ण केलं. त्यानंतर दोशी क्रिकेटपासून लांब गेले. दोशी यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीवर आत्मचरित्रही लिहिलं. ‘स्पिन पंच’ असं दोशी यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे.

दिलीप दोशींची कसोटी कारकीर्द

दिलीप दोशी यांनी 1979 साली 11 सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध एमए चिदंबरम स्टेडियमधून कसोटी पदार्पण केलं. विशेष म्हणजे दोशींनी पदार्पणात 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. दोशींनी पदार्पणात दोन्ही डावात एकूण 8 विकेट्स घेतल्या होत्या. तर दोशींनी एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये 14 सप्टेंबर 1983 रोजी कसोटी कारकीर्दीतील अखेरचा कसोटी सामना पाकिस्तान विरुद्ध खेळला. दोशींनी 33 कसोटी सामन्यांमधील 55 डावांमध्ये एकूण 114 विकेट्स मिळवल्या. दोशींनी 6 वेळा 5 विकेट्स घेतल्या होत्या.

एकदिवसीय कारकीर्द

दोशींची एकदिवसीय कारकीर्द 3 वर्षांची राहिली. दोशींनी 6 डिसेंबर 1980 रोजी मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध पदार्पण केलं. तर पाकिस्तान विरुद्ध 17 डिसेंबर 1982 साली अखेरचा एकदिवसीय सामना खेळला. या दरम्यान दोशींनी 15 सामन्यांमध्ये 22 विकेट्स मिळवल्या. तसेच दोशी यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सौराष्ट्रसह बंगाल आणि नॉटिंघमशायरचं प्रतिनिधित्व केलं.

दिलीप दोशी यांचं कुटुंब

दिलीप दोशी यांच्या पश्चात त्यांची पत्नी कालिंदी, मुलगा नयन आणि मुलगी विशाखा असा परिवार आहे. नयन यानेही फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये वडिलांप्रमाणे सौराष्ट्र आणि सरेचं प्रतिनिधित्व केलं. दोशी गेल्या 1 दशकापेक्षा जास्त काळापासून लंडनमध्ये राहत होते.

बीसीसीआयकडून श्रद्धांजली

दरम्यान दिलीप दोशी यांच्या निधनानंतर अनेक आजी माजी क्रिकेटपटूंनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच क्रिकेट चाहत्यांनीही दोशींबाबतच्या कामगिरीचा उल्लेख सोशल मीडियावर पोस्ट करत केलाय. बीसीसीआयने दोशींना श्रद्धांजली वाहिली आहे.