
मुंबई :भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी20 मालिका सुरु आहे. पण चर्चा रंगली आहे ती भारताच्या दक्षिण अफ्रिका दौऱ्याची. त्याला कारणही तसंच आहे. टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेसाठी आतापासूनच रोडमॅप तयार केला जात आहे. त्यामुळे तिन्ही फॉर्मेटमध्ये निवडलेल्या संघांची चर्चा रंगली आहे. हार्दिक पांड्या नसल्याने टी20 चं कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे देण्यात आलं आहे. वनडेसाठी केएल राहुल आणि कसोटीचं कर्णधारपद रोहित शर्माकडे देण्यात आलं आहे. पण या तिन्ही संघांतील खेळाडूंची निवड चर्चेचा विषय ठरला आहे. टी20 फॉर्मेटमध्ये फिट बसणारे खेळाडूंना वनडे संघात स्थान दिलं आहे. त्यामुळे आगामी टी20 वर्ल्डकप संघात त्यांना स्थान मिळेल की नाही याबाबत साशंकता आहे. संजू सॅमसननंतर असंच एक नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे युजवेंद्र चहल..युजवेंद्र चहल याची निवड वनडे संघात करण्यात आली आहे. त्यामुळे माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने राग व्यक्त केला आहे. वनडे वर्ल्डकप संघातही त्याला स्थान न दिल्याने हरभजनने आगपाखड केली होती.
‘टी20 संघात युजवेंद्र चहल नाही. तुम्ही त्याला वनडे संघात घेतलं आहे आणि टी20 संघात डावललं. त्यांनी फक्त त्याला चोखण्यासाठी लॉलीपॉप दिला आहे. ज्या फॉर्मेटमध्ये त्याची कामगिरी जबरदस्त त्यात तुम्ही त्याला स्थान दिलं नाही. हे खरंच समजण्यापलीकडचं आहे.’, असा रोष हरभजन सिंग याने व्यक्त केला आहे. वनडे वर्ल्डकप संघात स्थान न मिळाल्यानंतर युजवेंद्र चहल सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे ट्रॉफीत खेळला होता. या स्पर्धेत तो हरयाणा संघाकडून खेळाला. या दहा सामन्यात त्याने एकूण 19 गडी बाद केले होते.
‘दक्षिण अफ्रिका दौरा वाटतो तितका सोपा नसेल. फलंदाजांची इथे चांगलीच कसोटी लागणार आहे. संघात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे नाही. त्यांचा पुनरागमनाचा मार्ग खडतर आहे. त्यामुळे काही खेळाडूंना संधी आहे. पण ते नामवंत खेळाडू आहेत हे विसरून चालणार नाही. मला वाटत नाही की निवडकर्त्यांनी राहाणे, पुजारा आणि उमेश यादव यांच्याशी चर्चा केली असेल.कारण हे जेव्हा खेळले तेव्हा त्यांनी चांगली कामगिरी केली आहे.’, असंही हरभजन सिंग पुढे म्हणाला.