
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी बीसीसीआय निवड समिती शनिवारी 18 जानेवारीला भारतीय संघाची घोषणा करणार आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा हे दोघे पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेतून चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियात 2 प्रबळ दावेदार असणाऱ्या खेळाडूंना संधी मिळणार नसल्याचं समोर आलं आहे. ते दोघे कोण आहेत? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.
मीडिया रिपोर्टनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अनुभवी फलंदाज करुण नायर आणि संजू सॅमसन या दोघांना संधी मिळणार नसल्याचं म्हटलं जात आहे. निवड समिती दुसरा विकेटकीपर म्हणून ऋषभ पंत याचा समावेश करु शकते. तसेच विजय हजारे ट्रॉफीतील 2024-2025 या हंगामातील 7 सामन्यांमध्ये 5 शतकांसह 700 पेक्षा अधिक धावा करणाऱ्या करुण नायरला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संधी मिळणार नसल्याचं म्हटलं जात आहे.
स्पोर्ट्स तकने सूत्रांद्वारे दिलेल्या वृत्तानुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी विकेटकीपर म्हणून केएल राहुल हा पहिली पसंती आहे. तर बॅकअप विकेटकीपर म्हणून ऋषभ पंत याचा समावेश करण्यात येणार आहे. केएल राहुल याने 2023 वनडे वर्ल्ड कपमध्येही विकेटकीपरची भूमिका पार पाडलेली. तसेच केएल मिडल ऑर्डरमध्ये फलंदाज म्हणूनही यशस्वी ठरला होता. तसेच पंत अपघातानंतर श्रीलंकेविरुद्ध वनडे सीरिज खेळला होता. पंतची एकदिवसीय क्रिकेटमध्ये समाधानकारक कामगिरी राहिली आहे.
तर दुसऱ्या बाजूला संजू सॅमसन याने शेवटच्या एकदिवसीय सामन्यात शतक ठोकलं होतं. मात्र संजू विजय हजारे ट्रॉफीत सहभागी नसल्याने त्याची निवड होणार नसल्याचं म्हटलं जात आहे. मात्र संजूने गेल्या काही टी 20i सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली होती. मात्र या कामगिरीचा निवड समितीवर किती परिणाम होईल? हे संघ जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होईल.
तर दुसऱ्या बाजूला करुण नायर याने या हंगामात कॅप्टन्सीसह उल्लेखनीय फलंदाजीही केलीय. नायरच्या नेतृत्वात विदर्भाने विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. नायरने इथपर्यंत खेळलेल्या 7 सामन्यांमध्ये 5 शतकांसह 752 धावा केल्या आहेत. मात्र या कामगिरीचाही निवड समितीवर काहीही फरक पडणार नसल्याचं मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे आता या दोघांबाबत अंतिम निर्णय काय होतो? याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.