
भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर एकही वनडे सामना खेळलेला नाही. त्यामुळे भारतीय संघाला वनडे क्रिकेट खेळण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. पुढच्या महिन्यातही भारतीय संघ आशिया कप स्पर्धेत टी20 फॉर्मेटमध्ये खेळणार आहे. त्यामुळे भारताची प्रतीक्षा आणखी वाढणार आहे. आता भारतीय संघ थेट ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळेल. अशा स्थितीत आयसीसीकडून वनडे गोलंदाजांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत फिरकीपटूंनी वर्चस्व गाजवल्याचं दिसत आहे. दक्षिण अफ्रिकेच्या फिरकीपटू केशव महाराज या यादीत टॉपला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात जबरदस्त गोलंदाजी केली होती. त्याने 33 धावा देत पाच गडी बाद केले होते. त्याचं फळ त्याला आयसीसी क्रमवारीत मिळालं आहे. केशव महाराज या यादीत पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे. याआधी 2023 मध्ये वनडे क्रिकेट क्रमवारीत पहिल्या स्थानावर होता. दोन वर्षानंतर केशव महाराज नंबर वन झाला आहे.
केशव महाराजने श्रीलंकेचा फिरकीपटू महेश तिक्षाणाला मागे टाकलं आहे. केशव महाराजचे 687 रेटिंग गुण आहेत. तर तिक्षाणाचे रेटिंग गुण हे 671 इतके असून दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या भारतीय फिरकीपटू कुलदीप यादव आहे. त्याच्या खात्यात 650 गुण आहेत. नामिबियाचा फिरकी गोलंदाज बर्नार्ड स्कोल्झ चौथ्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज पाचव्या स्थानावर आहे आणि न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज मिचेल सॅटनर सहाव्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री सातव्या स्थानावर आहे. हा एकमेव गोलंदाज वगळता सर्व फिरकी गोलंदाज आहेत.
श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा 619 रेटिंग गुणांसह आठव्या स्थानावर आहे. भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा 616 रेटिंग गुणांसह नवव्या क्रमांकावर आहे.ऑस्ट्रेलियाचा अॅडम झांपा दहाव्या स्थानावर आहे. त्याचे रेटिंग गुण हे 608 आहेत. या यादीत पाकिस्तानचा कोणताही गोलंदाज टॉप-१० मध्ये स्थान मिळवू शकला नाही. तर मोहम्मद शमी 596 गुणांसह 13व्या, जसप्रीत बुमराह 595 गुणांसह14व्या आणि मोहम्मद सिराज 593 गुणांसह 15 व्या स्थानावर आहे.