
आयसीसी वूमन्स वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत भारतीय संघाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात विजयी सलामी दिली. भारताने 30 सप्टेंबरला श्रीलंकेवर 59 धावांनी मात केली. त्यानंतर आता टीम इंडिया रविवारी 5 ऑक्टोबरला आपल्या मोहिमेतील दुसरा सामना खेळणार आहे. टीम इंडिया या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध भिडणार आहे. मात्र या सामन्याआधी बीसीसीआयने महिला ब्रिगेडला काही आदेश दिल्याचं समजत आहे. बीसीसीआय सूत्रांनुसार, या सामन्यात पाकिस्तानी संघातील खेळाडूंसह हस्तांदोलन न करण्याचे आदेश बीसीसीआयने दिले आहेत.
अवघ्या काही दिवसांपूर्वी मेन्स टी 20i आशिया कप 2025 स्पर्धेची सांगता झाली. या स्पर्धेत टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान दोन्ही संघ एकूण 3 वेळा आमनेसामने आले. मात्र टीम इंडियाने या तिन्ही वेळेस पाकिस्तानसह हस्तांदोलन टाळलं. आता त्याप्रमाणेच महिला ब्रिगेडलाही तसंच करायला सांगितल्याचं म्हटलं जात आहे.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान हा सामना रविवारी 5 ऑक्टोबरला कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे. बीसीसीआय सूत्रांनुसार, कोलंबोला रवाना होण्याआधीच टीम इंडियाला पाकिस्तान विरुद्ध हस्तांदोलन न करण्याबाबत आदेश देण्यात आले होते. टॉस दरम्यान तसेच सामन्यानतर खेळाडूंसह हस्तांदोलन करायचं नाही असं सांगण्यात आलं आहे. तसेच बीसीसीआय याबाबत खेळाडूंच्या पाठीशी असणार आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील संघर्ष आणखी वाढला. त्यामुळे आशिया कप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध खेळू नये, अशी भूमिका देशवासियांची होती. मात्र क्रीडा मंत्रालयाने बहुराष्ट्रीय स्पर्धा असल्याने अडवणूक करताना येणार नाही, असं धोरणात म्हटलं होतं. तसेच पाकिस्तान विरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळणार नसल्यांचही क्रीडा मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.
त्यानंतर टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान दोन्ही संघ साखळी, सुपर 4 आणि अंतिम फेरीत अशा एकूण 3 वेळा आमनेसामने आले. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने तिन्ही वेळेस टॉस दरम्यान पाकिस्तानी कॅप्टन सलमान आघा याच्यासह हस्तांदोलन केलं नाही. तसेच सामन्यानंतरही टीम इंडियाने आपल्या भूमिकेवर ठाम राहत पाकिस्तानसह हस्तांदोलन केलं नाही.
काही महिन्यांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये फिरायला आलेल्या निष्पाप पर्यटकांवर बेछूट गोळीबार करुन त्यांना ठार केलं. त्यामुळे भारतात संतापाची लाट उसळली. त्यामुळे यापुढे पाकिस्तानसह कोणताच संबंध ठेवायचा नाही, अशी भावना भारतीयांची होती. मात्र क्रीडा मंत्रालयाच्या परवानगीमुळे टीम इंडियाला पाकिस्तान विरुद्ध खेळावं लागलं. भारतीय खेळाडूंनीही हस्तांदोलन न करुन आपला राग दाखवून दिला. टीम इंडियाच्या या नो हॅन्डशेक प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली. त्यामुळे आता 5 ऑक्टोबरच्या सामन्यात काय होतं? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.