
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने रविवारी 9 फेब्रुवारीला कटकमध्ये इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात धमाका केला. रोहितला गेल्या अनेक महिन्यांपासून धावांसाठी संघर्ष करावा लागत होता. मात्र रोहितने मोठी, शतकी आणि मॅचविनिंग खेळी केली. रोहितच्या या खेळीमुळे क्रिकेट चाहत्यांना हिटमॅनकडून असलेल्या मोठ्या खेळीची प्रतिक्षा अखेर संपली. रोहितला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अवघ्या काही दिवसांआधी सूर गवसला आणि भारतीय चाहत्यांना दिलासा मिळाला. रोहितने इंग्लंडविरुद्ध 119 धावा केल्या. रोहितच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे 32 वं शतक ठरलं. रोहितने 11 ऑक्टोबर 2023 नंतर पहिलवंहिलं एकदिवसीय शतक ठोकलं.
रोहितने 76 बॉलमध्ये झंझावाती शतक पूर्ण केलं आणि त्याच्यावर टीका करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. रोहितने 119 धावांच्या खेळीत 12 चौकार आणि 7 षटकार लगावले. रोहितच्या या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 305 धावांचं आव्हान हे 6 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं. रोहितने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. रोहितने या विजयानंतर मन मोकळं केलं. तसंच रोहितने शुबमन गिल याचं कौतुक केलं. रोहित आणि शुबमन या दोघांनी विजयी धावांचा पाठलाग करताना 136 धावांची शानदार सलामी भागीदारी केली.
“हे फार चांगलं होतं. तिथे खेळून आणि टीमसाठी काही धावा करुन मला फार आनंद झाला. मालिकेच्या दृष्टीने महत्त्वाचा सामना होता. मी या सामन्याला टप्प्या-टप्प्यात विभागलं. वनडे फॉर्मेट टी 20i पेक्षा मोठा आणि कसोटी क्रिकेटपेक्षा लहान आहे. मात्र त्यानंतरही तुम्हाला परिस्थितीनुसार बॅटिंग करावी लागेल. मी लक्ष केंद्रीत करुन शक्य तिथवर बॅटिंग करु इच्छित होतो. जेव्हा तुम्ही काळ्या मातीच्या खेळपट्टीवर खेळता तेव्हा ती थोडंफार निसरडी असते, त्यामुळे तुम्ही संपूर्ण बॅट दाखवणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी आज माझ्या हिशोबाने तयारी केली”, असं रोहितने म्हटलं.
“मी गॅपचा पूर्णपणे फायदा उचलला आणि मला शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर या दोघांकडून चांगली साथ मिळाली. आम्ही एकमेकांच्या बॅटिंगचा आनंद घेतो, गिल फार चांगला खेळाडू आहे. मी त्याला फार जवळून पाहिलंय. शुबमन कोणत्याही स्थितीत डगमगत नाही, घाबरत नाही”, असं म्हणत रोहितने शुबमनचं कौतुक केलं.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्ती.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जोस बटलर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, गस अॅटकिन्सन, आदिल रशीद, मार्क वूड आणि साकिब महमूद.