Team India : सूर्याच्या नेतृत्वात युवा ब्रिगेडचा टी 20 मध्ये मालिका विजयाचा ‘पंच’, इंडियाची घोडदौड रोखणं अशक्य!

Indian Cricket Team : टीम इंडियाने नववर्षातील आणि मायदेशातील पहिलीवहिली आणि टी 20i मालिका जिंकली. टीम इंडियाने 5 सामन्यांच्या मालिकेत 3-1 ने आघाडी घेतली. टीम इंडियाने या विजयासह आपला वर्ल्ड रेकॉर्ड आणखी भक्कम केला.

Team India : सूर्याच्या नेतृत्वात युवा ब्रिगेडचा टी 20 मध्ये मालिका विजयाचा पंच, इंडियाची घोडदौड रोखणं अशक्य!
suryakumar yadav india t20i captain
Image Credit source: Bcci
| Updated on: Feb 01, 2025 | 10:43 AM

टीम इंडियाने चौथ्या टी 20i सामन्यात इंग्लंडवर 15 धावांनी विजय मिळवला. हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे या विस्फोटक ऑलराउंडर जोडीच्या स्फोटक अर्धशतकी खेळीनंतर गोलंदाजांनी त्यांची भूमिका सार्थपणे पार पाडली आणि टीम इंडियाला विजयी करण्यात महत्त्वाचं योगदान दिलं. हार्दिक आणि शिवम या दोघांनी केलेल्या प्रत्येकी 53 धावांच्या खेळीमुळे टीम इंडियाने 181 धावा केल्या. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी 182 धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडला 166 वर रोखलं. टीम इंडियाने या विजयासह ही मालिकाही जिंकली. टीम इंडियाने चौथ्या सामन्यातील तिसऱ्या विजयासह 5 मॅचच्या सीरिजमध्ये 3-1 अशा फरकाने आघाडी घेतली.

टीम इंडियाने यासह मायदेशातील टी 20i मालिका विजयाची परंपरा कायम ठेवली. टीम इंडियाचा हा 2019 पासूनचा मायदेशातील सलग 19 वा टी 20i मालिका विजय ठरला. तसेच सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाने एकूण पाचवी तर सलग चौथी टी 20i मालिका जिंकण्याची कामगिरी केली.

टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

टीम इंडियाने मायदेशात सर्वाधिक आणि सलग टी 20i मालिका जिंकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आणखी भक्कम केला आहे. टीम इंडियाने 2019 पासून आतापर्यंत 17 मालिका जिंकल्या आहेत. टीम इंडियानंतर या यादीत ऑस्ट्रेलियाचा दुसरा क्रमांक आहे. ऑस्ट्रेलियाने 2006 ते 2010 या कालावधीत सलग 8 मालिका जिंकल्या होत्या. तर दक्षिण आफ्रिकेने 2007 ते 2010 दरम्यान 7 टी 20i मालिकांवर आपलं नाव कोरलं होतं.

सूर्यकुमारचा ‘पंजा’

दरम्यान सूर्यकुमार यादव याची कर्णधार म्हणून इंग्लंडविरुद्धची ही सहावी टी 20i मालिका आहे. सूर्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने एकही मालिका गमावलेली नाही. रोहित शर्मा याने वर्ल्ड कप विजयानंतर टी 20i फॉर्मेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सूर्यकुमारची श्रीलंका दौऱ्याआधी कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. सूर्याने तेव्हापासून टीम इंडियाला कर्णधार म्हणून 5 मालिकांमध्ये विजय मिळवून दिला आहे. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका ही बरोबरीत राहिली आहे.

सूर्यकुमारची कर्णधार म्हणून आकडेवारी

सूर्यकुमार यादव टीम इंडियाचा टी 20i मधील चौथा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. सूर्याने त्याच्या नेतृत्वात आतापर्यंत 21 पैकी 17 सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. रोहित शर्मा हा यशस्वी कर्णधारांच्या यादीत पहिल्या, महेंद्रसिंह धोनी दुसऱ्या आणि विराट तिसऱ्या स्थानी आहे.