
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना जयपूर येथे होणार असून, या दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत अपेक्षित आहे. जयपूरमध्ये होणारा हा पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना असेल. याआधी आंतरराष्ट्रीय सामन्याच्या नावावर येथे केवळ 12 वनडे आणि 1 कसोटी सामना खेळवण्यात आला आहे.

जयपूरमध्ये खेळवल्या जाणाऱ्या पहिल्या आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये कोणता संघ वरचढ ठरेल की सामना अटीतटीचा होईल, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला दोन्ही संघांमधील आतापर्यंतची आकडेवारी पाहावी लागेल. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये आतापर्यंत दोन्ही संघ 17 वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये न्यूझीलंडने 9 वेळा विजय मिळवला आहे तर भारताने 6 वेळा विजय मिळवला आहे. तर 2 सामने टाय झाले आहेत.

आज दोन्ही संघ भारतीय मैदानावर सातव्यांदा भिडणार आहेत. यापूर्वी उभय संघांमध्ये खेळवण्यात आलेल्या 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये न्यूझीलंडने 3-2 ने आघाडी घेतली आहे. म्हणजेच किवी संघाने 3 सामने जिंकले असून भारताने केवळ 2 सामने जिंकले आहेत. तर 1 सामना बरोबरीत सुटला आहे.

T20 मधील दोन्ही संघांमधील शेवटच्या 5 सामन्यांवर नजर टाकल्यास, टीम इंडिया 4-1 च्या मोठ्या फरकाने न्यूझीलंडपेक्षा पुढे आहे. यापैकी 2 सामने भारतीय संघाने सुपर ओव्हरमध्ये जिंकले आहेत.

भारतीय कर्णधार रोहित शर्माने आतापर्यंत न्यूझीलंडविरुद्धच्या 4 टी-20 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. यापैकी 2 जिंकले आहेत आणि 2 गमावले आहेत. त्याचबरोबर न्यूझीलंडच्या टीम साऊदीचा कर्णधार म्हणून भारताविरुद्धचा हा तिसरा टी-20 सामना असेल. याआधी त्याला 2 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते.