IND vs NZ: नमन धीरला बाद करताच न्यूझीलंडच्या गोलंदाजाने खिशातून काढलं पोकेमॉन कार्ड; किस करून साजरा केला विकेटचा आनंद, लिहिलं…
Blair Tickner News: नमन धीरची विकेट घेतल्यानंतर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ब्लेअर टिकनरने आपल्या खिशातून पोकेमोन कार्ड काढून त्याचे चुंबन घेत अनोख्या पद्धतीने आनंद साजरा केला.

पाचव्या टी-20 सामन्यात भारतीय फलंदाज नमन धीरला बाद केल्यानंतर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ब्लेअर टिकनरने एका अनोख्या आणि मनोरंजक कृतीने आनंद साजरा केला. 19 व्या षटकात धीर बाद झाल्यानंतर टिकनरने आपल्या खिशात हात घालून एक पोकेमॉन ट्रेडिंग कार्ड बाहेर काढले. त्याने लाल अग्नी ऊर्जेचे चिन्ह असलेले ते कार्ड टीव्ही कॅमेऱ्यांसमोर अभिमानाने दाखवले, त्याचे प्रेमाने चुंबन घेतले आणि नंतर ते परत खिशात ठेवले.
सामन्याच्या दृष्टीने न्यूझीलंडसाठी नमन धीरची विकेट निर्णायक होती. धीर आक्रमक फलंदाजी करत होता, त्याने 23 चेंडूंमध्ये 33 धावा केल्या होत्या. असे वाटत होते की तो एकहाती भारताला 200 धावांच्या पुढे घेऊन जाईल. टिकनरने चतुराईने ऑफ-स्टंपच्या बाहेर नकल बॉल टाकला आणि धीरने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेत उंच गेला, जिथे एक्स्ट्रा कव्हरला उभ्या असलेल्या मायकल ब्रेसवेलने मागे धावत जाऊन एक अप्रतिम झेप घेत झेल घेतला. एक धोकादायक डाव संपुष्टात आणला.
सामन्यात ईशान किशनचे अर्धशतक आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने 20 षटकांत 8 गडी गमावून 191 धावा केल्या. मात्र भारताच्या या मोठ्या धावसंख्येपेक्षाही ब्लेअर टिकनरने पोकेमॉन कार्डसोबत केलेला जल्लोष सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला. वास्तविक पाहता पोकेमॉन ट्रेडिंग कार्ड गेममध्ये एनर्जी कार्ड्स कोणत्याही पोकेमॉनला आक्रमण करण्याची शक्ती देतात.
टिकनरकडे असलेले फायर एनर्जी कार्ड लाल-नारंगी पार्श्वभूमीवर असून त्यावर काळ्या रंगाचे आगीचे चिन्ह आहे, जे पोकेमॉन विश्वातील अग्नीशी संबंधित शक्तींचे प्रतीक आहे. या मालिकेत दोन्ही संघांनी भरपूर धावा केल्या आणि अनेक विक्रमही रचले. टीम इंडियाने या मालिकेतील प्रत्येक सामन्यात षटकारांचा वर्षाव केला आणि 2026 साली 400 षटकारांचा टप्पा गाठला. असे करणारा भारत जगातील पहिला संघ ठरला.
अवघ्या काही महिन्यांपूर्वीच भारत 300 षटकार मारणारा पहिला संघ ठरला होता. भारताने यावर्षी 40 टी-20 सामन्यांमध्ये 400 हून अधिक षटकार मारले आहेत. दुसरा कोणताही संघ भारताच्या जवळपासही नाही. ग्लेन फिलिप्सने या मालिकेत 341 धावा करून टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनण्याचा मान मिळवला. त्याने इंग्लंडच्या फिलिप सॉल्टला मागे टाकले, ज्याने 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत 331 धावा केल्या होत्या.